फास्टॅगचा अत्यंत कटू अनुभव
सरकारने येत्या जानेवारीपासून टोलनाक्यांवर फास्टॅग सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा अर्धाकच्चा निर्णय आहे. कारण फास्टॅग लेनमध्येही मोटारींना मिनिट्भर तरी थांबावेच लागते. ही एक प्रारंभिक अडचण म्हणून सोडून देऊ, पण फास्टॅगवर दोनदा टोलआकारणीचे प्रकार सर्रास घडतात आणि त्याचा परतावा मिळवणे महाकर्मकठीण आहे.
गेल्या 11 तारखेला मी मुंबईहून पुण्याला जाताना खालापूर टोलनाक्यांवर फास्टॅगमधून टोल कापला गेला, आता पुढे तळेगाव टोलनाक्यांवर टोल देण्याची गरज नसते, पण तेथे मला उडवण्यात आले आणि टोल भरावा लागेल असे सांगण्यात आले. मला तिथे हुज्जत घालण्याची इच्छा नसल्याने मी टोल रोखीने भरून निघालो.
घरी पोहचल्यावर नॅशनल हाय वे अथाॅरिटी कस्टम केअरला 1033 वर फोन करून तक्रार नोंदवली. ही तक्रार नोंदवणे हे एक दिव्य होते. दोन्ही टोलनाक्यांवर किती वाजता गेला, कोणत्या दिवशी गेला, लेन नंबर किती होता, ट्रान्झॅक्शन नंबर काय आहे, नाव काय आहे, गाडीचा नंबर काय आहे ही माहिती द्यावी लागली. नंतर त्या कस्टमरला केअरच्या बाईने एक व्हाटस्अप नंबर दिला व त्यावर त्यांनी टोल आकारल्याच्या मेसेजचा स्क्रीन शाॅट, पावतीचे तसेच ड्रायव्हींग लायसेन्स, गाङीची कागदपत्रे यांचे फोटो पाठवण्यास सांगितले. पण मी दोनदा टोल भरून कोणताही गुन्हा केला नसल्याने मी ही माहिती पाठविण्यात नकार दिला.
नंतर काही वेळाने ज्या HDFC बॅंकेचा हा फास्टॅग आहे, त्या बॅंकेचा फोन आला व त्यानी ही सर्व माहिती व फोटो मेल करा असे सांगितले, पण मी ही माहिती पाठविण्यात नकार दिला व दोष तुमच्या यंत्रणेतील आहे, तो दुरूस्त करा व पैसे परत करा असे सांगितले. अर्थात पैसे परत होणार नाहीत हे मला माहिती आहे. आता मी नॅशनल हायवे अथाॅरिटी, HDFC बॅंक आणि या खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांच्या मानगुटीवर बसून पैसे मिळवणार आहे. शिवाय कधीही फास्टॅग वापर करणार नाही.
– दिवाकर देशपांडे, मुंबई