हैदराबाद – प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात हैदराबाद येथील एका मोठ्या औषध कंपनीत सुमारे ४०० कोटी रुपयांचे अघोषित मालमता सापडली आहे. तसेच मालमत्ता खरेदीसाठी केलेल्या कराराचे पुरावे देखील उघड झाले आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार, पाच राज्यांतील एकूण २० ठिकाणी छापे टाकण्यात आले. एक फार्मास्युटिकल समूह हा इंटरमीडिएट, अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटक आणि फॉर्म्युला तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेला असून त्यांची बहुतेक उत्पादने युरोपियन देश आणि अमेरिकेत निर्यात केली जातात.
या छाप्यात सुमारे ४०० कोटींच्या अघोषित उत्पन्नाशी संबंधित पुरावे उघडकीस आले आहेत, त्यापैकी ३५० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. सुमारे १ कोटी ६६ लाख रुपयांची रोकडही या काळात वसूल केली गेली आहे.
या छाप्यात डिजिटल माध्यमात कागदपत्रे इत्यादी स्वरूपात पुरावे सापडले आहेत. काही बनावट व अस्तित्त्वात नसलेल्या संस्थांकडून केलेल्या खरेदीशी संबंधित इतर खर्चही शोधण्यात आला आहे. या कालावधीत, अचल मालमत्ता खरेदीसाठी केलेल्या देयकाशी संबंधित पुरावे देखील उघड झाले आहेत. या व्यतिरिक्त इतर बेहिशोबी खर्चही सापडले आहेत.