नाशिक – महानगरपालिकेकडून फांद्या छाटणीच्या नावाखाली वृक्षतोड केल्याची बाब समोर आली आहे. सिडको परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वामी विवेकानंद, राणे नगर परिसरात प्रबोधनकार ठाकरे सभागृह मैदान येथे वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी विना परवानगीने केलेली वृक्षतोड चालते का, असा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे. झाडाच्या फांद्या छाटल्या म्हणून महानगरपालिका प्रशासन मोठ्या रुबाबात सर्वसामान्यांना व विशेषतः सोसायट्यांना नोटीस बजावतात. आता प्रत्यक्ष अधिकारी वृक्षतोड करत असल्यावर यावर पालिका काही भूमिका घेणार का असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर महापालिकेला यावरून ट्रोल केले जात आहे. अनधिकृत, बेजबाबदार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात शहरातील तरुणांनी आवाज उठवला आहे. तसेच, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.