पंढरपूर – भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाजपने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात ५ वर्षे पक्षीय राजकारण केले. भारतनाना भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने त्यांच्या २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आणि आज फडणवीस इथे येऊन भाजपला मत द्या सांगत आहेत. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो. अहो मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा परतावा अद्याप दिला नाही तर इतर मागण्या काय मान्य करतील ? असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.
भाजप प्रचार करताना सांगतंय की आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे ? असा सवाल करतानाच मंगळवेढा-पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
विठ्ठल – रखुमाई मंदिर परिसरातील लोकांचे प्रश्न, कारखान्यांचे प्रश्न, शहरातील इतरही प्रश्न आहेत. इथला कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार भगीरथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे नानांच्या भगीरथला मत स्वरुपात आशीर्वाद द्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढाकरांना केले आहे.