मनाली देवरे, नाशिक
…….
अखेर मुंबई इंडियन्स हीच टीम आखाती देशात झालेल्या ड्रीम इलेव्हन आयपीएल २०२० या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी ठरली. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स ने दिल्ली कॅपीटल्सचा ५ गडी राखून पराभव केला आणि विजेतेपदाच्या चमचमत्या ट्रॉफीसह २० कोटी रूपयांची गलेलठ्ठ रक्कम बक्षिसापोटी पटकावली.
सोमवारी सकाळपासून बिहार निवडणुकीचा निकाल जाणून घेतांना वेगवेगळया एक्झीट पोलची वाट लागतांना बघायला मिळत होती. परंतु, राञी उशिरा संपलेल्या या अंतिम सामन्यात माञ आयपीएलचा एक्झीट पोल तंतोतंत खरा ठरतांना बघायला मिळाला. दिल्ली विरूध्द मुंबई लढतीत मुंबई इंडीयन्सचेच पारडे जड होते आणि जिंकली देखील तीच टीम आणि ते देखील अगदी सहजपणे.
सुप‘रोहीट’ शर्मा हा संघाचा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेत़ृत्वाखाली मुंबईला आयपीएलमध्ये पाचवे विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम साध्य झाला आहे. या सामन्यात जिंकतांना तोच पुढे होता. १५६ धांवाचे आव्हान पेलतांना त्याने दिल्लीची गोलंदाजी पुरती निष्प्रभ ठरवली. कागिसो रबाडावर आक्रमण करून त्याला थोपवतांना अनुभवी रविचंद्रन अश्वीनला देखील रोहीतने मान वर करू दिली नाही. नॉर्टजे, स्टॉयनीस आणि अक्षर पटेल हे दिल्लीच्या ताफ्यातले सगळे गोलंदाज या महत्वाच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. इशान किशन हा मुंबईचा असा फलंदाज आहे ज्याने सातत्याने या मुंबईसाठी धावांचे योगदान दिले आहे. या सामन्यात त्याची ३३ धावांची खेळी देखील मुंबईच्या विजयाचा मोठा हिस्सा ठरली.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करतांना २० षटकात १५६ धावांचे लक्ष्य मुंबईला विजयासाठी दिले होते. हे लक्ष्य कमी असले तरी ज्या पध्दतीने दिल्लीचा डाव सुरूवातीला डगमगला होता त्याचा विचार करता नंतर श्रेयस–रिषभ जोडीने तो अतिशय चांगला सावरला. बोल्टच्या आणि डावाच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनीस बाद झाला. दुस–या षटकात बोल्टने अंजिक्य रहाणेचा अडसर देखील दूर केला आणि संघ अशा उत्तम स्थितीत असतांना, रोहीत शर्माने डावखु–या शिखर धवनला शह देण्यासाठी जयंत यादवच्या हातात चेंडू दिला. बोल्ट आणि बुमराह हे मध्यमगती गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी टाकत असतांना देखील अशा प्रकारे जयंत यादव या ऑफ स्पिनरच्या हातात चेंडू देण्याची कल्पना सुनील गावस्करसह इतर समालोचकांना काही रूचली नव्हती. त्यांनी ती बोलूनही दाखवली. परंतु, आपल्या तिस–याच चेंडूवर रोहीतचा विश्वास जयंत यादवने सार्थ ठरवला. जंयतच्या एका फसव्या चेंडूवर केवळ शिखर धवनच नव्हे तर सुनील गावस्करसारखा धुरंदर क्रिकेटपटू देखील क्लिन बोल्ड झाला असे म्हणायला हरकत नाही.
३ बाद २२ या धावसंख्येनंतर माञ मुंबईकर गोलंदाजांना बराच काळ गळ टाकून बसावे लागले कारण श्रेयस–रिषभ जोडीने ९६ धावांची भागिदारी रचून दिल्लीला मोठा आधार दिला. बाद होण्यापुर्वी रिषभच्या ५६ धावा आणि त्यानंतर श्रेयसने फटकेबाजी करून जमवलेल्या ६५ धावांच्या जोरावर दिल्लीला १५६ धावांपर्यंत हा डाव घेवून जाता आला. मुंबईतर्फे ट्रेन्ट बोल्ट आणि कुल्टर नाईल यांनी तर बळी घेवून सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन केलेच, परंतु त्याचबरोबर जयंत यादवने ४ षटकात अवघ्या २५ धावा देवून किफायतशीर गोलदांजीचे प्रदर्शन केले आणि रोहीतचा अॅक्श्ान प्लॅन देखील यशस्वी केला होता.
टॉस जिंकून दिल्ली कॅपीटल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स विरूध्द यशस्वी ठरलेला हा फॉम्युला श्रेयसने या सामन्यात बदलला नाही. दिल्लीने संघातही बदल केला नव्हता. याउलट, मुंबईने राहुल चहर याच्या एैवजी ऑफ स्पिनर जयंत यादवला खेळवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघाच्या फलंदाजांच्या यादीत डावखु–या फलंदाजांची संख्या जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
सलग ५२ दिवस सुरू असलेल्या या सिझनची सांगता होतांना संघाच्या फ्रॅजायझींना जरी तुलनेने कमी रक्कम मिळणार असली तरी क्रिकेट चाहत्यांना माञ कोवीडच्या या निगेटीव्ह दिवसांमध्ये रोमांचक क्रिकेटचे लाईव्ह दर्शन झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. उपविजेत्या ठरलेल्या दिल्ली कॅपीटल्सला १२.५० कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले. यंदा कोवीडमुळे आखातात झालेली ही स्पर्धा प्रेक्षकांच्या उपस्थितीविनाच खेळली गेली आणि त्यामुळे बीसीसीआय कडे हवा तसा ‘गल्ला’ न जमल्याने २०१९ च्या तुलनेत सर्व बक्षिसांची रक्कम निम्मी करण्यात आली होती. सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या अनुक्रमे ३ व ४ क्रमांकांवर राहीलेल्या संघाना ८.५० कोटी रूपयांचे पारितोषीक मिळाले.