नाशिक – कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर इतर कोरोना बाधितांना जीवदान देण्यासाठी प्लाझ्मा दान करण्याची संधी प्राप्त होत आहे. यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. संमती दिल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या विविध चाचण्या करुन प्लाझ्मा घेतला जात आहे. यासाठी मिशन झिरो नाशिक या अभियाना अंतर्गत विशेष हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे.
प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेअंतर्गत कोरोनावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान देण्यासाठी पुढे येत आहेत. संमती पत्रे भरून देत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी झालेल्या १८ ते ५५ वयोगटातील व इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा इतर कोरोना बाधित रुग्णांना दिला जातो. त्यायोगे सदरील रुग्ण कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी होतात. प्लाझ्मा दानासाठी ८६६९६६८८०७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नंदकुमार साखला यांनी केले आहे.
२८६ कोरोनाबाधित
मिझन झिरो नाशिक अंतर्गत मंगळवारी (५१ व्या दिवशी) १३२२ नागरिकांनी आपल्या अँटीजेन चाचण्या करून घेतल्या. त्यापैकी २८६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. आज पर्यंत एकूण ६२ हजार ६३९ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १० हजार ३०८ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे. ५१ दिवसात सरासरी दररोज १२२८ च्या वर अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. सरासरी दररोज २०२ च्या वर पॉझिटिव्ह रुग्णांना शहरातून शोधून काढण्यात आले आहे. एकूण चाचण्यांपैकी ५२ हजार ३३१ रुग्णांना कोरोनाच्या भीतीतून मुक्ती व दिलासा या अभियानात मिळाला आहे. त्याचे प्रमाण एकूण झालेल्या चाचण्यांपैकी ८३.५४% येते.