रामपूर – उत्तर प्रदेशातील रामपूर येथे सिनेमात शोभून दिसेल अशीच घटना घडली. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री गेलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या नातेवाईकांनी पकडले. रात्रभर त्याला बदडले. आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हवालीही केले. पण त्या गावकऱ्यांच्या मनात काय आले देव जाणे, त्यांनी मध्यस्थी करून या दोन प्रेमी जीवांचे लग्नच लावून दिले. या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
अजीमनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही घटना घडली. रामपूर जिल्ह्यातील एका गावातील तरुणाचे अजीमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावातील मुलीवर प्रेम होते. घरी काही माहीत नसल्याने हा प्रियकर रात्री तिला भेटायला येत असे. असाच तो भेटायला आला असताना मुलीच्या नातेवाईकांना काही संशय आला. ते सावध झाले आणि या प्रेमवीराला काही कळायच्या आताच त्यांनी त्याला पकडले आणि भरपूर चोपले. त्याला एका खोलीत बंद करून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस आले आणि त्याला चौकीत घेऊन गेले.
त्यानंतर मात्र, हे प्रकरण वाढण्याच्या भीतीने गावातील मान्यवर व्यक्तींनी आपापसांत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि तब्बल ५ तासांनी त्यांना यात यश आले. दोन्ही कुटुंब राजी झाले आणि दोघांचे लग्न लावून देण्यावर एकमत झाले. आणि लगोलग भटजी बोलावून या दोघांचे शुभमंगलही करण्यात आले.