भोपाळ (मध्य प्रदेश) – बैतूलमध्ये एका पत्नीने आपल्या बाहेरख्याली नवऱ्याला धडा शिकविण्यासाठी एक अफलातून योजना रचली. त्यासाठी तिने आपल्या मैत्रीणींची मदत घेतली. पत्नीने स्वतः प्रेयसी होण्याचे नाटक रचले. या जाळ्यात नवरा फसला आणि कथित प्रेयसीला भेटण्यासाठी तो सांगितलेल्या स्थळावर पोहोचला तेव्हा त्याच्यापुढे पत्नी उभी होती. त्यानंतर अर्थातच पत्नी व तिच्या मैत्रीणींनी मिळून नवऱ्याची चांगली धुलाई केली. अखेर पोलिसांना मध्यस्थी करून प्रकरण शांत करावे लागले.
बैतुल जिल्ह्यातील बिघवा गावातील ही घटना आहे. वसंत उईके २०१६ मध्ये लग्न झाल्यापासूनच पत्नीला खूप मारायचा. दोघांमधील वादावर कुटुंब सल्लागार केंद्रात सुनावणी सुरू होती. पत्नीला शंका होती की तिचा नवरा तरुणींना आपल्या जाळ्यात फसवून अनैतिक संबंध प्रस्थापित करतो. त्याची खात्री पटल्यावर तिने एका अनोळखी मोबाईल नंबरवरून पतीला संपर्क साधला.
या जाळ्यात अडकून वसंत याने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्रेयसी झालेल्या पत्नीने त्याला बैतुल जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भेटायला बोलावले. वसंत देखील तिथे मोठ्या उत्साहात पोहोचला. पण त्याच्यापुढे अचानक त्याची पत्नीच आली. इथे कुणाला भेटायला आला, असे विचारल्यावर वसंतला उत्तर देता आले नाही. पती नालायक असल्याचे सिद्ध झाल्यावर पत्नी आणि तिच्या मैत्रीणींनी चांगलीच धुलाई केली. ते बघून परिसरातील नागरिक गोळा झाले. अखेर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले आणि प्रकरण शांत केले.
असे आहे प्रकरण
आरोग्य विभागात कार्यरत वसंत नेहमी इतर महिल्यांना जाळ्यात अडकवून पत्नीला मात्र दररोज मारायचा. त्यामुळे ती त्रस्त झाली होती. अखेर तिने आपल्या बहिणी व मैत्रीणींना सोबत घेऊन हे नाट्य रचले.