पाटणा – प्रेमभंग झालेल्या लोकांना देवदास होताना आपण पाहिले असेल, पण प्रेमिकेने प्रेमात धोका दिल्याच ब्रँडिंग करून एका युवकाने पैसे कमावणे सुरू केले आहे. ‘बेवफा चायवाला’ नावाने त्याने चहाचे दुकान उघडले आहे. पाटण्यातील बोअरिंग कॅनल रोडच्या किनारी असलेल्या त्याच्या टपरीवर चहा पिण्यासाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी उसळते. आगामी काळात त्याच्या मित्रांसोबत तो दुकानांची साखळीच उघडणार आहे. त्याच्या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रेमीयुगुले, प्रेमात धोका खालेल्यांसाठी वेगवेगळे चहा आणि त्याचे दर उपलब्ध आहेत.
चहा एक पण वेगळे दर वेगळे
चहाच्या दुकानांमध्ये हे दुकान जरा वेगळे आहे. यामध्ये त्याच्या खासगी आयुष्यातील दुःख सामावलेलं आहे. प्रेमभंग झालेल्या लोकांना चहाच्या दरात सवलत दिली जाते. तर प्रेमीयुगुलांना १५ रुपयांचा चहा दिला जातो. प्रेमात धोका मिळाला असेल, तर चहा १० रुपयांमध्ये मिळते. कुल्हडमध्ये दिला जाणारा स्पेशल चहा. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे दर असल्यावरही ग्राहकांची कोणतीच हरकत नाही. आलेले ग्राहक चहाचा आस्वाद घेत दुकानाच्या नावामागचे कारण जाणून घेतात. गेल्या दोन महिन्यांपासून हे दुकान सुरू आहे.
प्रेमिकेच्या आठवणीवरून सुरू केले स्टार्टअप
हे दुकान व्हॅलेंटाइन विकमध्ये यावर्षी ८ फेब्रुवारीला तीन मित्रांनी उघडले होते. एका दिवशी कल्पना सुचली आणि दुस-या दिवशी सकाळी रस्त्याच्या किनारी दुकान टाकले. हळूहळू सामान आणले आणि नंतर काउंटरही उघडले. पाटण्यामधील महुआ बागमध्ये राहणा-या संदीप कुमारची दुकान उघडण्याची कल्पना आहे. संदीपचे पाच वर्षांपूर्वी एका मुलीशी प्रेम जुळले होते. ते अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, २०२० मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. हा निर्णय मुलीचा होता असे संदीप सांगतो. त्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेला संदीप आता सामान्य आयुष्य जगत आहे. अद्याप त्याने लग्न केले नसले तरी तो स्वतःच्या पायावर उभा आहे. त्या ब्रेकअपला तो विसरला नाही. त्यामुळे बेवफा चायवाला या नावाने स्टार्टअप सुरू केले आहे.