नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २२ ठिकाणी छापे घालून जप्तीची कारवाई केली आहे. मध्यप्रदेशातील बैतुल इथल्या सोया उत्पादनांच्या कारखान्यात तसेच, सतना येथे आणि महाराष्ट्रात मुंबई आणि सोलापूर तसेच कोलकाता येथे ही कारवाई करण्यात आली.
या शोधमोहिमेत, ८ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४४ लाख रुपये मूल्याचे बेहिशेबी परदेशी चलन जप्त करण्यात आले. या छाप्यात, बँकेची नऊ लॉकर्स देखील आढळली आहेत.
या शोध मोहिमेत सुमारे २५९ कोटी रुपयांच्या मूल्याचे बेहिशेबी उत्पन्न कोलकात्यातील बनावट कंपन्यांमध्ये भाग भांडवलाच्या रूपाने गुंतवले असल्याचे आढळले.
तसेच, कंपनीच्या लेखापुस्तकात ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचा उल्लेख असून, कोलकात्यातील आणखी एका बनावट कंपनीत भाग भांडवल म्हणून केवळ कागदोपत्री ही गुंतवणूक केल्याचे आढळले.
या कंपन्यांपैकी एकही कंपनी सुरु नसून, त्यांच्या पत्यावर अशा कंपन्या आणि त्यांचे संचालक असल्याचे कुठेही सिध्द झालेले नाही. यापैकी अनेक कंपन्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बंद केलेल्या आहेत.
या शोधमोहिमेदरम्यान, नफा लपवण्यासाठी या कंपन्यांनी ५२ कोटी रुपयांचा खोटा तोटा दाखवल्याचेही आढळले. तसेच, लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राईव अशा डिजिटल साधनांमधूनही कंपनीच्या गैरव्यवहारांचे अनेक पुरावे सापडले आहेत.
आतापर्यंतच्या तपासानुसार, या कंपनीकडे ४५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढचा तपास सुरु आहे.
संगमनेरसह अन्य ठिकाणीही छापे
मुंबई – प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर आणि पुण्यातील एका कंपनीच्या, महाराष्ट्रातील ३४ ठिकाणच्या विविध कार्यालयांवर शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली. या कंपन्या, तंबाखू आणि त्याच्याशी संबधित उत्पादनांची निर्मिती, पॅकेजिंग आणि विक्री तसेच ऊर्जावितरण, एफएमसीजी आणि बांधकाम व्यवसायांशी संबधित आहेत.
या शोध मोहिमेत, हस्तलिखित आणि कॉम्युटर वरील एक्सेल शीट्स मध्ये असलेल्या हिशेबांमध्ये २४३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख तंबाखू विक्री केल्याची माहिती आढळली. त्याशिवाय, काही तंबाखू उत्पादनांशी संबधित व्यवहारांची चौकशी करतांना, आणखी सुमारे ४० कोटी उत्पादनांची बेहिशेबी विक्री केल्याचेही आढळले.
हे व्यावसायिक, बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवहारांमध्ये नोंदणीकृत किमतीपेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारत आणि देत असल्याचेही लक्षात आले आहे. यासंदर्भात १८ कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार झाल्याचे पुरावे आढळले आहेत. प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ५०C चे उल्लंघन केल्याप्रकरणी, २३ कोटी रुपयेही आढळले आहेत.
या शोध मोहिमेदरम्यान बांधकाम खरेदी विक्रीच्या बेहिशेबी व्यवहारांमध्ये ९ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे या व्यावसायिकाने (करदात्याने) मान्य केले. एक कोटी रुपये इतकी बेहिशेबी रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत, ३३५ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले आहे. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.