देवळाली कॅम्प:- कोविड महामारीच्या काळात अनेकांना प्राणवायूचे महत्व लक्षात आले आहे. माणसासोबत पर्यावरणातील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायू हे झाड देत असते. मागील काही वर्षांमध्ये पर्यावरणाची सातत्याने हानी होत आहे.त्यामुळे पृथ्वीचे पर्यावरण सतत बदल होतो आहे. यासाठी झाडांचे रोपण करत संगोपन करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विजय मेधने यांनी केले.
देवळालीतील मविप्र संचलित श्रीमजी तेजुकाया महाविद्यालय व माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने सिन्नर तालुक्यातील बोरखिंड येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य डॉ. मेधने बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष खंडेराव मेढे, उपाध्यक्ष वैभव पाळदे,प्रा.डॉ. शशिकांत भोज, गजीराम मुठाळ, जीवन गायकवाड, सोमनाथ खातळे, नगरसेवक संजय शिंदे, संजय गोडसे, प्रशांत कांडेकर, नगरसेवक संग्राम करंजकर, प्रशांत धिवंदे, प्रविण गायकवाड, पत्रकार वाल्मिक शिरसाठ, ज्ञानेश्वर काळे, गावचे सरपंच गणेश कर्मे, उपसरपंच विक्रम कवटे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, समाज मंदिरासह अनेक नागरिकांच्या घरापुढे उंबर, फणस, आंबा, जांभूळ, चिंच, पेरू यां फळझाडांसह प्राणवायूपूरक वृक्षांची १०० पेक्षा अधिक झाडांचे प्रत्येक उपस्थितांच्या हस्ते रोपण करण्यात आले. तर महाविद्यालयाच्या वतीने मागेल त्याला वृक्ष उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना २०० झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोगतातून अध्यक्ष मेढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून माजी विद्यार्थी महासंघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यापुढे आता महाविद्यालयाच्या बाहेर देखील आदर्शवत असा माजी विद्यार्थी संघ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतांना वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.दौलत शिंदे, प्रा.सुनील आहेर ,प्रा.सोपान एरंडे, प्रा.चंद्रकांत संधान, प्रा. शशिकांत अमृतकर, प्रा.मिलिंद ठाकरे किरण रकिबे, उमेश देशमुख, संजय देवकर आदींसह माजी विद्यार्थी व ग्रामस्थ प्रयत्नशील होते.