नाशिक – बदनामी करतो असा जाब विचारल्याच्या कारणातून तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एकास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. एस. वाघवसे यांनी चार वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०१८ मध्ये भगुर गावात घडली होती.
अय्युब गणी शेख (रा.समतावाडी,भगुर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत तब्रेज हुसेन शेख याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. तब्रेज शेख,हुसेन शेख व तब्रेजचा आते भाऊ असे तीन जण २१ मे २०१८ रोजी रात्री भगुर गावातील पटेल गल्लीतून जात असतांना ही घटना घडली होती. तब्रेज शेख याने वाटेत भेटलेल्या अय्युब शेख यास माझी बदनामी का करतो अशी विचारणा केली असता हा हल्ला झाला होता.
संतप्त अय्युब शेख याने शिवीगाळ करीत धारदार चाकू तब्रेजच्या पोटात खुपसल्याने तो जखमी झाला होता. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक व्ही.एस.पोटे यांनी या गुह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिशांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड. एस.जी.कडवे यांनी काम पाहिले. त्यांना हवालदार आर.डी.सानप आणि कोर्ट अंमलदार पोलीस नाईक एस.यु.गोसावी यांनी सहाय्य केले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपास यंत्रणेने सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपी अय्युब शेख यास चार वर्ष सश्रम कारावास आणि चार हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.