जळगाव – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (२१ ऑगस्ट) सकाळी टाकलेल्या छाप्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्यासह लिपिकाला अटक करण्यात आली आहे. लाच घेताना दोन्ही जण रंगेहाथ पकडले गेल्याने महसूल विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वाळूचे ट्रक जप्त करण्यात आले. ते पोलिस ठाण्यात होते. हे ट्रक सोडण्यासाठी तब्बल सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. एका खाजगी व्यक्ती (एजंट) मार्फत ही बोलणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे (वय ३६, रा. सागर पार्क समोर, सरकारी निवासस्थान) यांच्यासह लिपिक अतुल अरुण सानप (वय ३२, रा. मेहरुण) या दोघांना एसीबीच्या पथकाने लाच घेताना अटक केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केल्याने ती यशस्वी ठरली आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उप अधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस कॉन्स्टेबल अशोक अहिरे, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासा पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहे.