नाशिक – शहरातील जुन्या डॉक्टरांपैकी एक आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विनय ठकार (वय ७४) यांचे पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली आणि ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रतिभा, मुलगा डॉ. चारुहास, मुलगी गौरी असा परिवार आहे. डॉ. चारुहास आणि गौरी हे दोन्हीही सध्या अमेरिकेत आहेत.
अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ होते. अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी त्यांनी मार्गदर्शन केले. ते उत्तम फोटोग्राफर होते. त्यांच्या संग्रहात लक्षावधी फोटो आहेत. मुलांमध्ये निसर्गप्रेम वाढावे म्हणून त्यांनी शेकडो स्लाईड शो केले. पक्षीप्रेमी आणि उत्तम फोटोग्राफर असल्याने त्यांनी अनेक देशांमध्ये प्रवास करुन निसर्ग, पक्षी यांचे फोटो काढले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ सदस्य आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जुन्या पिढीतील ते पाहिले हृदयविकार तज्ञ होते. सेवाभावाचा त्यांनी आदर्श निर्माण केला. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन आधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते सदैव तत्पर होते. त्यांचा मुलगा डॉ. चारुहास हे अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात जगप्रसिध्द किडनी विकार तज्ज्ञ आणि संशोधक आहेत.