नाशिक – माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक शेखर गवळी हे सेल्फी घेताना इगतपुरी तालुक्यातील मानस हॉटेल परिसरातील खोल दरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून अंंधार पडल्याने शोधकार्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी हे शोधकार्य सुरू करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळी हे ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यात आले होते. त्यांच्यासोबत काही जण होते. मानस हॉटेलच्या परिसरात ते आला असता एका खोल दरीच्या ठिकाणी ते सेल्फी काढत होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने ते २५० फूट खोल दरीत कोसळले. याठिकाणी असलेल्या डोहात ते पडले. त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यासंदर्भात इगतपुरी तहसिल कार्यालय आणि पोलिसांनी काही जणांनी माहिती कळवली. त्यानंतर इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. वाघमारे यांनी तातडीने बचाव पथकाशी संपर्क केला. मात्र, त्यावेळी अंधार झाला होता. त्यामुळे गवळी यांच्यासाठी शोधकार्य झालेले नाही. त्यामुळे बुधवारी पहाटे हे शोधकार्य सुरू होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गवळी यांच्या पायात शूज नव्हते. खडकावर ते फोटोसाठी उभे राहिले व पाय सटकला आणि ते धबधब्यात पडले. जेथे ते पाणी पडते तिथे यु (U) आकार आहे त्यात ते पडले. प्रथम त्यांचा हात दिसला. नंतर ते दिसले नाहीत. तेथे कपार आहेत, असे स्थानिक लोक सांगतात. गवळी यांच्या वडिलांचे निधनही गेल्या १५ दिवसांपूर्वीच झाले आहे.
दरम्यान, गवळी यांच्या मृत्यूमुळे ट्रेकिंग आणि क्रिकेट क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
क्रिकेटपटू शेखर गवळी यांच्याविषयी त्यांचे मित्र श्री महेंद्र छोरिया यांनी सांगितलेल्या आठवणी (व्हिडिओ)