पुणे – जिल्हा व राज्य अंतर्गत प्रवास बंदी राज्यामध्ये उठवावी अशी आग्रही मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. यासंदर्भात पंचायतीने मुख्य सचिव, सर्व विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहे.
पंचायतीने पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाने ई पास रद्द केला आहे. जनता भारतात कुठेही जाऊ शकते असे पत्र मुख्य सचिव, गृह खाते यांनी सर्व राज्यातील मुख्य सचिवांना दिलेले आहे. आपणास विनंती की, आपण केंद्र शासनाचे आदेशाचे पालन करावे आणि जनतेला जिल्हा बाहेर जाताना तसेच राज्याबाहेर जाताना भ्रष्ट अधिकारी वर्गाकडून त्रास दिला जात आहे या त्रासातून जनतेला मुक्त करावे. जनता लॉक डाऊन मुळे आधीच होरपळलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे त्यांचे उद्योग धंदे बंद आहेत, त्यांना काम मिळवणे साठी प्रवास करावा लागतो आहे तर उद्योगाचे ठिकाणी माल, कामगार इतर राज्यातून येणे साठी अडचणी येत आहेत. राज्याची तसेच देशाची अर्थ व्यवस्था सुरळीत होणे साठी सर्व प्रवास बंदी त्वरित उठवणेची गरज आहे. तसेच जनतेची स्वतःची रोजी रोटी मिळवणे साठी जनतेला जिल्हा बाहेर, राज्याबाहेर जाणे येणे जरुरीचे आहे तरी आपण त्वरित आदेश देऊन सर्व प्रवास बंदी त्वरित उठवावी आणि भ्रष्टाचार थांबवावा ही विनंती पत्रात करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विजय सागर यांनी हे पत्र दिले आहे.