नाशिक – महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, स्थायी समिती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहाही प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक झाली.
पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदी शीतल माळोदे, पूर्व प्रभाग समिती सभापतीपदी अँड श्याम बडोदे, नवीन नाशिक प्रभाग सभापती पदी चंद्रकांत खाडे, नाशिकरोड प्रभाग समिती सभापती पदी जयश्री खर्जुल,नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापतीपदी अँड वैशाली भोसले व सातपूर प्रभाग समिती सभापती पदी रवींद्र धिवरे यांची निवड केल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केली.
या वेळी नगरसचिव राजू कुटे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. यानंतर या सर्व सभापतींचा सत्कार पीठासन अधिकारी तथा मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केला. तसेच मा. महापौर सतीश कुलकर्णी,उपमहापौर भिकुबाई बागुल, मा.स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृहनेते सतीश सोनवणे,विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांचे सह गटनेते,नगरसेवक आदींसह पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार केला.