– किशोर पाठक हे त्यांच्या अक्षर वाङ्मयाच्या निमित्ताने आपल्यात असतील
– ग्रामीण लेखक विजयकुमार मिठे यांनी स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले विचार
नाशिक – किशोर पाठक यांनी जीवन भर शब्दांशी मैत्र केले आणि नाशिक सह महाराष्ट्रात प्रतिभावंत कवी म्हणून कीर्ती संपादन केली. कवी शरीराने आपल्यात नसला तरी त्याच्या कवितेच्या रूपाने तो कायमचा आपल्यात असतो. किशोर पाठक हे त्यांच्या अक्षर वाङ्मयाच्या निमित्ताने आपल्यात असतील , असे विचार कवी व ग्रामीण लेखक विजयकुमार मिठे यांनी किशोर पाठक प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास राजेंद्र उगले प्रशांत कापसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी किशोर पाठकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अँड. अभिजित बगदे यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या विविध कार्यक्रमातील किशोर पाठक, आनंद जोर्वेकर यांच्या आठवणी जागविल्या. सार्वजनिक वाचनालयाचा साहित्यिक मेळावा आणि किशोर पाठक हे सतत एकरूप झालेले होते असे ते म्हणाले. शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध साहित्य विषयक कार्यक्रम किशोर पाठक यांनी पुढाकार घेऊन पुढे नेले, असे प्रशांत कापसे यांनी सांगितले.
किशोर पाठकांच्या मनात अनेक साहित्यविषयक उपक्रम होते, त्यांच्या हयातीत ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. त्यांना आदरांजली म्हणून पुढील काळात असे उपक्रम वाचनालयाने राबवावे असे प्रतिपादन राजेंद्र उगले यांनी केले. किशोर पाठक हे बालकांसाठी लिहिणारे कवी होते. सार्वजनिक वाचनालयाच्या अक्षरबाग साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना अनेक मानसन्मान मिळायला हवे होते. पण तत्पूर्वी नियतीने त्यांना आपल्यातून नेले, अशी खंत बालविभाग प्रमुख संजय करंजकर यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालय आणि किशोर पाठक यांचं नातं दृढ होतं. दीर्घकाळ वाचनालयात विविध साहित्यविषयक उपक्रम त्यांनी राबविले होते. अशी आठवण कार्याध्यक्ष वसंतराव खैरनार यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना सांगितली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि संयोजन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी केले होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख गिरीश नातू यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक शंकर बोऱ्हाडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते किशोर पाठकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक चंद्रकांत महामिने यांच्या सुविद्य पत्नी सुशीला चंद्रकांत महामिने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.