भाजप किसान मोर्चाचा निर्धार
मुंबई ः भाजप किसान मोर्चाच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्याचा पीकविमा काढण्याचे अभियान सुरू आहे. पीकविम्याच्या मुदतीसाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणचे पक्ष कार्यकर्ते, हितचिंतक, पदाधिकारी यांनी मदत करावी, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
भाजप किसान मोर्चाच्या वतीने राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा पीकविमा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, भाजप कार्यकर्त्यांशिवाय समाजातील अन्य सामाजिक संस्था संघटना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा यासाठी प्रयत्न करावेत, असे डॉ. बोंडे म्हणाले. बळीराजाच्या कष्टाची सुरक्षितता खूप गरजेची आहे. चालू हंगामातील पीकविमा काढण्याची शेवटची तारीख ३१ जुलै ही आहे. पीकविमा प्रत्येक शेतकऱ्याला का आवश्यक आहे याची प्रचिती प्रत्येक शेतकऱ्याला गेल्या ३-४ वर्षांत आलेली आहे. अवघ्या तीन चारशे रुपयांच्या विमा हप्त्यात साधारण दहा हजार रुपयांची भरपाई राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळाली आहे.
प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी- लावणी-उगवण न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पन्नात येणारी घट याची नुकसानभरपाई यात मिळते. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असून, योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास ‘सहभागी न होणेबाबत घोषणापत्र’ योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर कर्ज मंजूर केलेल्या बँकेत देणे आवश्यक आहे म्हणजे बँक विमा हप्ता कपात करणार नाही.
विभागनिहाय भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा, तीळ, नाचणी, कारळे या पिकांचा विमा काढला जातो.