पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रशासनाला निर्देश
नाशिक – जिल्ह्यातील तालुका स्तरावर बेडची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटरचीनिर्मिती करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले.
दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ या तालुक्यांची कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी येथील मविप्र महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी भुजबळ म्हणाले की, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोविडच्या उपाययोजनांबाबत माहिती द्यावी. कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषध उपचार करून लक्ष ठेवण्यात यावे. प्रत्येक तालुक्यात गावनिहाय तपासणी मोहीम राबवावी.
यावेळी खासदार डॉ. भारती पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना केल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका स्तरावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी दिली. बैठकीला आमदार नितीन पवार, श्रीराम शेटे, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रांताधिकारी संदीप आहेर आदी उपस्थित होते.
दररोज स्क्रिनिंग करा
लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी उद्योग व कंपन्या सुरू ठेवाव्या लागणार आहेत. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी हळू हळू पावले टाकावे लागत आहेत. उद्योग क्षेत्रात होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गास रोखण्याच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे दररोज स्क्रिनिंग करावे. कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आढळलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी. रुग्णांची माहिती लपविण्यात येऊ नये, याबाबत कंपन्या व उद्योगांना सूचना देण्यात याव्यात. रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात. दिंडोरीमध्ये तत्काळ सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम सुरू करण्यात यावी. कंन्टेन्मेंट झोनचा एरिया संपूर्ण प्रतिबंधित करण्याबरोबरच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. तालुका रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यात समन्वय राहण्यासाठी कॉल सेंटर अथवा हेल्पलाइनचा उपयोग करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.