मुकुंद बाविस्कर
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
अशी सुंदर कविता लिहिणारे कवी वामन रामराव कांत उर्फ वा .रा. कांत यांची आज मंगळवार,. ६ ऑक्टोबर रोजी जयंती, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुमारे ६० वर्षे अथकपणे मराठी काव्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या या प्रतिभावंत कवी विषय….
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात !
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?
छेडीती पानांत बीन थेंब पावसाचे ,
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे ,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात;
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात!
अशी अत्यंत सुंदर आणि भावस्पृशी कविता लिहिणारे कवी वामन रामराव कांत उर्फ वा .रा. कांत १९२५ पासून सुमारे ६० वर्षे अथकपणे मराठी कवितेची सेवा पार पाडणारे, रविकिरण मंडळ, मर्ढेकर यांच्या कालखंडाचे साक्षी आणि आपल्या स्वतंत्र शैलीच्या कवितेने या कालखंडाच्या पलीकडे पोचलेले एक समर्थ कवी म्हणून त्यांची ओळख होती.
वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह लक्ष्मीबाई ( पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर ) यांच्याशी १९३० मध्ये झाला. खरे म्हणजे निजामी राजवटीतील हैदराबाद, मराठवाडा येथे त्यांची कविता प्रतिकूल वातावरणात जन्माला आली आणि बहरली, असे म्हणता येईल.
“शब्द माझा धर्म ! शब्द माझे कर्म ! शब्द माझे वर्म .ईश्वराचे !!” असे म्हणणारे कवी कांत सतत निष्ठेने कविता लिहीत राहिले. कवितेबरोबरच त्यांनी अनेक अनुवाद ग्रंथ मराठीत प्रसिद्ध केले. नाट्यलेखन व ललित लेखनही केले आहे. कविवर्य कांत यांची कविता हे मराठी काव्याचे एक वैभवशाली दालन आहे. त्यांच्या काव्यसंग्रहात फटकार (१९३३) रुद्रवीणा (१९४७) शततारका (१९५० ),वेलांटी (१९६२) वाजली विजेची टाळी (१९६५) मरण गंध (१९७६) दोनुली (१९७९) मावळते शब्द (१९८८) यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी विहंगमाला’ या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापनाचे काम केले.
निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून काही काळ नोकरी केली. दरम्यान ,निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत १९४५ ते १९६० या काळात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले . त्यानंतर पुढे दहा वर्ष देशातील आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर विभागप्रमुख म्हणून काम पाहिले . त्यानंतर १९७० मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यात प्रामुख्याने ‘वेलांटी ‘ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार , ‘मरणगंध ‘ या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.’ दोनुली’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत ‘ पुरस्कार. मावळते शब्द’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत’ पुरस्कार यांचा समावेश आहे. त्याशिवाय कांत यांना विविध सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. यात इ.स. १९८८ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे इ.स. १९८९ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान करण्यात आला,विशेष म्हणजे त्याच वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन देखील सन्मान करण्यात आला. तरीही काही प्रमाणात त्या काळातील अन्य कवींप्रमाणे ते प्रसिध्दीपासून दूरच होते. त्यामुळे नव्या पिढीला त्यांची फारशी ओळख नाही , असे म्हटले जाते. साहित्य शारदेची सेवा करणारे वा .रा .कांत यांचे निधन १ १सप्टेंबर १९९१ रोजी झाले.