मुंबई – रेल्वेचा पहिला एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच तयार झाला आहे. वातानुकुलित प्रवासाचा याला जगातील सर्वांत स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कपूरथळा रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये पहिला कोच तयार झाला असून याला आता पुढील ट्रायलसाठी लखनऊच्या आरडीएसओला पाठविले जात आहे.
या कोचचे भाडे कमी असेल आणि एसी थ्री टायर व स्लिपर कोचच्या मध्ये त्याची गणना होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कोचच्या डिझाईनवर गेल्यावर्षी आक्टोबरमध्ये युद्धस्तरावर काम सुरू झाले होते, हे महत्त्वाचे.
या कोचमध्ये ७२ एवजी ८३ बर्थ असतील. प्रत्येक कोचमध्ये मोठे आणि दिव्यांगांना प्रवेश करता येईल असे प्रसाधनगृह असतील. दोन्ही बाजुला फोल्डींग टेबल, बॉटल, मोबाईल फोन आणि मॅगझीन होल्डर्स असतील.
प्रत्येक बर्थला वाचण्यासाठी लाईट्स व मोबाईलसाठी चार्जींग पॉईंट असतील. मिडल आणि अप्पर बर्थसाठी पायऱ्यांचे डिझाईन पूर्णपणे बदलण्यात आले आहे. येत्या आर्थिक वर्षात २४८ कोचेस तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
८३ बर्थचा कोच तयार करण्यासाठी कॅबीनला पहिलेच्या तुलनेत थोडे छोटे ठेवावे लागत आहे. बेड रोल ठेवण्याच्या जागेचाही सीटसाठी वापर होणार आहे. अश्या पद्धतीने ११ जागा एका डब्यात वाढतात तर २० डब्यांमध्ये २२० जागा वाढतात. या माध्यमातून लोकांची वेटींगच्या त्रासातून सुटका होईल आणि त्याचवेळी रेल्वेचे उत्पन्नही वाढेल.
डब्ब्यांचा आकार बदलणार नसून बर्थ वाढणार आहे. हळूहळू हायस्पीड ट्रनमधून स्लीपरची मागणी कमी होईल आणि लोक एसीने प्रवास करू लागतील. नव्या कोचमागे असाही तर्क लावण्यात आला आहे की स्लीपर कोचमध्ये खिडक्या उघडत असल्याने त्याचा प्रभाव गाडीच्या वेगावर होतो.
आता तर वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर इतर गाड्यांनाही १३० किंवा १६० किलोमीटर प्रती तास वेगाने पळविण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यात दिल्ली-मुंबई व दिल्ली-हावडा गाड्या ताशी १६० किलोमीटर वेगाने धावेल, यासाठी प्रयत्न होणार आहे.