मुंबई – अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराचे काम फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. श्रीराम जन्मभूमीमध्ये भव्य रामंदिराच्या निर्माणासाठी पाया रचण्याचे प्रारुप तयार झालेले आहे. पाया खोदण्याचे काम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेले असेल.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की रामंदिराच्या पायाभूत संरचनेवर अभियंत्यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. संपूर्ण मंदिर हे जगातील सर्वोत्तम इंजिनियरिंग रचनांमध्ये सामील होईल. १ फेब्रुवारीपासून पाया खणण्याचे कार्य सुरू होईल, अशी पूर्ण शक्यता आहे. राममंदिर शेकडो वर्षे सुरक्षित राहावे, यासाठी देशभरातील दहा मोठ्या एजन्सीजने जवळपास आठ महिने विचारमंथन केले आहे. त्यांनी सांगितले की रामंदिराचा पाया खणल्यानंतर ४० महिन्यांपर्यंत काम पूर्ण झालेले असेल. मंदिराचा ढाचा ज्या पायावर उभा राहणार आहे त्याचे वय, जास्तीत जास्त वर्षे पाया मजबूत राहावा यासाठी काय करता येईल, यावर अभियंत्यांनी बराच विचार केला आहे. त्यामुळे पाया पक्का राहावा, यासाठी ५० फूक खोल खोदकाम होणार आहे. त्यानंतर दगडांचे वजन सांभाळू शकेल, असा पाया तयार केला जाईल.
मानवनिर्मित कारागिरी
मंदिरावर मानव निर्मित कारागिरी होणार आहे. त्यासाठी अनुभवी लोकांची मदत घेतली जाईल. आरसीसी किंवा फेब्रीकेशनचे काम होणार नाही. दगडांचे वय वाढविण्यासाठी सीबीआरआय रुडकीच्या टीमने अभ्यास केला आहे. प्राचीन मंदिरे दगडांची बनली असल्याने ती हजारो वर्षे टिकलेली आहेत. ऊन-पाऊस-वाऱ्याने दगडांची होणारी झीज टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रामंदिरात एकूण चार लाख घनफूट दगड लागणार आहेत.
बँकांचे टोल फ्री क्रमांक
अयोध्येतील रामंदिराच्या निर्माणासाठी निधी समर्पण अभियान सुरू झालेले आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अधिकृत बँकांचे टोल फ्री क्रमांक जारी केले आहे. स्टेट बँक आफ इंडियासाठी 18001805155 तर पंजाब नॅशनल बँकेसाठी 18001809800 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.