नाशिक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील गणेश मूर्तींची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बुधवारी येथील गणेश मूर्ती केंद्राचे उदघाटन औरंगाबादचे पोलिस उपमहानिरीक्षक (कारागृह) दिलीप झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यंदा मूर्ती कमी प्रमाणात तयार करण्यात आल्या असून पाचशेच्या आसपास मूर्ती यंदा उपलब्ध झाल्या आहेत.
केंद्र उदघाटन वेळी कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ निरीक्षक अशोक कारकर, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी बाबर, सतीश गायकवाड, समाजसेवक विक्रम खरोटे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या काळातही बंद्यांनी वेळेत, सुबक आणि कमी किमतीतील गणेश मूर्ती घडविल्याबद्दल झळके यांनी कारागृह प्रशासनासह कैद्यांचेही कौतुक केले. अधिक्षक वाघ यांनी सांगितले की, काही मूर्तीकार बंदी पॅरोलवर गेले आहेत. शासनानेही घरगुती मूर्ती घडवाव्यात यावर भर दिला आहे. उंचीवर बंधने आणली आहेत. खबरदारी म्हणून यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती
यंदा मूर्तीची किंमत एक हजार ते तीन हजार आहे. विविध आकारातील गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. शाडूच्या मूर्ती असूनही सुबक सजावट करण्यात आली आहे. कारागृहात रसायन, सुतारकाम, बेकरी, लोहारकाम, विणकाम, धोबीकाम, शिवणकाम, चर्मकला आदी विभाग आहेत. पोलिस उपमहानिरीक्षक, औरंगाबाद यांच्या
मार्गदर्शनाखाली मूर्ती विभाग तीन वर्षापूर्वी सुरु झाला आहे.
असा वाढतोय महसूल
२०१७ मध्ये प्रथमच दीडशे सुबक गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने २०१८ मध्ये एक हजार सुबक मूर्ती बंद्यांनी घडविल्या. तेव्हा तेरा लाखांचा महसूल मिळाला. २०१९ मध्ये आठशे मूर्ती करण्यात आल्या. त्यात बारा फुटाची कागदाच्या लगद्याची मूर्ती होती. त्या वर्षी ११ लाख ३६ हजाराचा महसूल मिळाला. यंदाही चांगल्या
महसूलाची अपेक्षा आहे.