नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले प्रचंड यश हे लोकांचा विजय होता. तसेच मोदींनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून पंतप्रधानपद मिळवले. इतकेच नव्हे तर परराष्ट्र धोरणात मुत्सद्दीपणाची नवी परंपरा सुरू करण्याचे श्रेयही मोदींनाच जाते, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘द प्रेसिडेन्शियल ईयर्स, २०१२-२०१७ या आत्मकथनातील शेवटच्या भागात नमूद केले आहे.
स्व. प्रणव मुखर्जी यांनी या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर काम करण्याचे त्यांचे अनुभव सांगितले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज माजी पंतप्रधान मनमोहन सिंगपेक्षा कसे वेगळे होते हे देखील स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यातील मुलभूत फरक स्पष्ट करताना प्रणवदा पुस्तकात म्हणतात की, सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले . मात्र त्यापुर्वी यूपीएच्या घटकपक्षांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधान म्हणून निवडले होते. याउलट मोदी हे एक राजकारणी व्यक्तिमत्व असून त्यांना भाजपाने निवडणूक प्रचार सुरू करण्यापूर्वी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले होते.
पंतप्रधान मोदींना लवकरच परराष्ट्र धोरणाची जाणिव असल्याचे दिसून आले, कारण २०१२ च्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह सार्क देशांच्या सर्व प्रमुखांना आमंत्रित करण्याच्या निर्णयावर त्यांनी त्वरित सहमती दर्शविली. आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विस्तृत व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला होता. म्हणूनच परराष्ट्र मुत्सद्दी धोरणात एक नवीन परंपरा सुरू करण्याचे श्रेय मुखर्जींनी मोदींना पंतप्रधान म्हणून दिले आहे.
मुखर्जी यांच्या मते, लोकसभा निवडणूकीत भाजपाला प्रचंड बहुमत मिळवण्यात मोदी यांचा मोठा वाटा असून त्यांच्या मेहनतीने सर्वांना प्रभावित केले. तर दुसरीकडे, कोणत्याही कॉंग्रेस नेत्याने निवडणुकीपूर्वी यूपीए किंवा कॉंग्रेसला स्पष्ट बहुमताचा दावा केला नव्हता, स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही मित्रपक्षांनी एकत्र ठेवल्याबद्दल मुखर्जी यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले.