नवी दिल्ली – नवी दिल्लीत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल संपूर्ण देश व्यथित झाल्याचं सांगून मोदी यांनी आजच्या मन की बातमधे खंतही व्यक्त केली. भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला.
भारत आज औषधं आणि लसींच्या बाबतीत सक्षम आणि आत्मनिर्भर असल्यानंच जगाची सेवा करू शकत असल्याचं ते म्हणाले. भारत जितका अधिक सक्षम होईल, तितकी अधिक मानवतेची सेवा करू शकेल, तितका जास्त त्याचा जगाला लाभ होईल असं ते म्हणाले.
कोरोनाकाळात भारतानं जगातल्या इतर देशांना औषधं, वैद्यकीय साहित्य आणि लसींचा पुरवठा करत, केलेल्या मदतीबद्दल, इतर देश आणि भारताचे आभार व्यक्त करत असल्याचं त्यांनीआजच्या मन की बातमधे सांगितलं. या गोष्टींचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असल्याचंही ते म्हणाले.
जगातल्या प्रगत देशांच्या तुलनेत भारतानं अधिक वेगानं लसीकरण करत, केवळ १५ दिवसांच्या कालावधीत ३० लाखांहून अधिक कोरोना योद्ध्यांना लस दिली असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधे दिली.
भारतानं कोरोनाविरोधात दिलेला लढा जगासमोर एक उदाहरण म्हणून समोर आलं, त्याचप्रमाणे आता सुरु झालेला कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रमही उदाहरण ठरत असल्याचं ते म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपलं आयुष्य वाहिलेल्या प्रत्येकाच्या स्मृती जपण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली. अशा स्वातंत्र्य योद्धांबद्दल लिहीली जाणारी पुस्तकं हीच त्यांना श्रद्धांजली असेल असं ते म्हणाले. याचदृष्टीनं भारताच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच निमीत्तानं केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं युवा प्रोत्साहन देण्याचा उपक्रम सुरु केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कामातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं आहे, अशा शब्दात त्यांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरवही केला. या सर्वांच्या कामातून देशवासींनी प्रेरणा घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
देशातल्या महिला वर्ग प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असल्याचा उल्लेखही मोदी यांनी आजच्या मन की बातमधे केला. कोरोनाकाळात प्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी योग साधनेसारखं भारतीय संस्कृतीचं प्रतिक, जगभरासाठी किती उपयुक्त ठरलंय हे सांगताना, त्यांनी चिलीमधे योग साधनेच्या प्रचार प्रसारासाठी होत असलेले प्रयत्न आजच्या मन की बातमधून मांडले.
देशभरातले नागरिक, तंत्रज्ञानाच्या प्रयत्नानं देशात कृषी क्षेत्रात करत असलेले प्रयोग, स्वच्छतेसाठी नागरिक देत असलेलं योगदान, कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रयोग, पारंपरिक कला टिकवण्यासाठी करत असलेले प्रयत्न, कोरोनाकाळात आर्थिक संकटातून उभं राहण्यासाठी दिलेला लढा, कोरोना काळाचा नव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि अभिनवतेसाठी केलेले प्रयोग याचा उल्लेख करत, त्यापासून प्रेरणा घेण्याचं आवाहन मोदी यांनी आजच्या मन की बात मधे केलं.
कोरोनाचं संकट असतानाही मागच्या वर्षी देशानं असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं, यावर्षीही त्याचपद्धतीनं कठोर मेहनत करून आपल्याला संकल्पांची पूर्तता करत, देशाला वेगानं पुढं न्यायचा निर्धारही मोदी यांनी मन की बात मधे व्यक्त केला.