नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुक आयोगाकडे दररोज वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकमेकांची तक्रार घेऊन पोहोचत आहेत. बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधानांची तक्रार करणारे एक पत्र अलीकडेच निवडणुक आयोगाला लिहीले आहे. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी प्रचारासाठी व्हीव्हीआयपी विमान वापरत असल्याची टीका केली आहे.
राजकीय रॅली आणि प्रचारसभांसाठी मोदी व्हीव्हीआयपी विमानांचा वापर करीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावर आयोगाने कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. ‘सरकारी दौऱ्यांमध्ये पंतप्रधानांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. मात्र पंतप्रधान जेव्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात तेव्हा इतर नेत्यांवर अन्याय व्हायला नको. मला त्याचा त्रास झाला. एक पूर्वनियोजित कार्यक्रम मला रद्द करावा लागला.
मोदींच्या दौऱ्यामुळे सुरक्षेच्या कारणांनी मी कार्यक्रमाला वेळेवर पोहोचू शकलो नाही. मी रेल्वे मंत्रालयात होतो तेव्हा निवडणुकीसाठी कधीच आपल्या सरकारी यंत्रणेचा वापर केला नाही,’ याचा त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे. विदेश प्रवासासाठी ज्या व्हीव्हीआयपी विमानांचा वापर होतो ते राजकीय रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी वापरता येते का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढच्या टप्प्यातील मतदान ६ एप्रिलला होणार आहे.
मोदींच्या २३ रॅली
चार राज्य आणि एका केंद्र शासीत प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत २३ रॅली केल्या आहेत. यातील १० तर त्यांनी गेल्या तीन दिवसांत चार राज्यांमध्ये केल्या.