नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पायाला सूज आल्याचं सांगण्यात आलं. आपल्यावर हल्ला झाल्याचं ममता बॅनर्जी यांचं म्हणणं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं या घटनेचा तपशील मागवला आहे. ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
वैद्यकीय अहवालाकडे लक्ष
टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी एसएसकेएम रुग्णालया बाहेर येताना सांगितलं की, ममता बॅनर्जी यांचा एमआरआय करण्यात आला आहे. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाचं हाड तुटल्याचा अंदाज आहे. आम्ही वैद्यकीय अहवालाची वाट पाहात आहोत.
पाच डॉक्टरांची समिती
ममता बॅनर्जी यांना काल रात्री ग्रीन काॅरिडॉर बनवून रस्त्यानं नंदीग्रामहून कोलकाता इथं आणण्यात आलं. कोलकाता इथल्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालय असलेल्या एसएसकेएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाच डॉक्टरांची समिती गठित करण्यात आली आहे.
सुरक्षेसंदर्भात कुचराई
ममता बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा असताना चार-पाच युवकांनी त्यांना धक्का मारल्यामुळे त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता यांची काल सायंकाळी भेट घेतली. या वेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल गो बॅकच्या घोषणा दिल्या. या घटनेविरोधात तृणमूल काँग्रेसने भाजपविरुद्ध आंदोलन सुरू केले आहेत.
सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न
ममता बॅनर्जी यांनी राजकीय ड्रामा चालवला असून, नंदीग्राममध्ये अडचणी वाढल्याचं लक्षात येताच त्यांनी निवडणुकीपूर्वीच नाटकं सुरू केले आहेत, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.
नेमकं काय झालं
नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या कारला कथित धक्का दिल्यामुळे त्या दुखापतग्रस्त झाल्या आहेत.रियापारा इथं एका मंदिराच्या बाहेर उभ्या असताना ही घटना घडली. प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्यांना अनेक ठिकाणी दुखापती झाल्याचं निदर्शनास आलं आहे. एका पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे.
एसएसकेएम रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं, की ममता यांच्या डाव्या पायाच्या टाच आणि हाडांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. तसंच डाव्या खांदा, मान आणि मनगटालासुद्धा दुखापत झाली आहे. त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर श्वास लागणे आणि हृदयात वेदना झाल्याची तक्रार त्यांनी केली होती. पुढील ४८ तास त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील, असं सांगण्यात आलं.