वाशिम – पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही जणांना कोरोनाची लक्षणे असल्याची माहिती हाती आली आहे. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी झाली होती. यावेळी कोरोनाशी संबधीत असलेले नियम पाळण्यात आले नाही. याची गंभीर दखल घेऊन गुन्हाही दाखल करण्यात आला. पण, आता ही कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आहे.
कबिरदास महाराजांनी २१ तारखेला कोरोनाची टेस्ट केली होती. पण, आता आलेल्या रिपोर्टवरुन कबिरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. १९ जणांना कोरोनाची लागन झाल्यामुळे ही लागण गर्दीतून संक्रमीत झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतरवनमंत्री संजय राठोड २३ फेब्रुवारी पोहरादेवी येथे गेले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी गर्दी केली. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. या गर्दीची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेऊन कारवाईचे आदेश दिले होते.