नवी दिल्ली : शालेय पाठ्यपुस्तकात पुर्वी बाबल्या चित्तेवरून पळाला, अशी एक कथा होती. प्रत्यक्षात कर्नाटकमध्ये अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला मृत असल्याचे घोषित करण्यात आले होते, मात्र त्यानंतर पोस्टमार्टमसाठी त्याला नेण्यात आले, तेव्हा या व्यक्तीच्या शरीराची हालचाल जाणवली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तो जिंवत असल्याचे लक्षात आले, आता त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
एका रस्ते अपघातात शंकर गोम्बी नावाच्या २७ वर्षीय व्यक्तीला खासगी रुग्णालयाला ब्रेन डेड समजून दोन दिवसांच्या निरीक्षणानंतर मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह बागलकोट येथील महालिंगपूर शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्या व्यक्तीचे पोस्टमॉर्टम होणार होते. तसेच त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी देखील केली होती. मात्र पोस्टमॉर्टम करताना या मृत व्यक्तीमध्ये अचानक जीव आला आणि ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली.
डॉ.एस.एस. गलगली या वक्तीचे पोस्टमॉर्टम करणार होते. गलगली म्हणाले, पोस्टमॉर्टमला जाताना ही व्यक्ती जिवंत आहे, अशी माहिती नव्हती. कारण खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शंकरला व्हेंटिलेटरवरुन काढून टाकल्यानंतर त्याचे श्वास घेणे बंद झाले होते, मात्र जेव्हा शंकर गोम्बीचे पोस्टमॉर्टम सुरु केले तेव्हा त्याच्या शरीरात हालचाल होती. यानंतर शंकरच्या हृदयाचे ठोके तपासले असता ते सुरु असल्याचं निदर्शनास आले. यानंतर मी ताबडतोब त्याच्या कुटुंबियांना बोलावले आणि त्याला दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले .या प्रकरणी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र शंकर जिवंत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.