मुंबई – इंडियन पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) येत्या १ एप्रिलपासून रोख काढणे आणि जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. आता ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्तवेळा पैसे काढणे किंवा जमा करण्यावर वेगळे शुल्क लावले जाणार आहे. यासंदर्भात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने नोटीस जारी केला आहे.
आयपीपीबीच्या नव्या नियमांनुसार बचत खात्यातून एक महिन्यात चार वेळा रोख काढल्यास कुठलेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतर रोख काढण्याचा प्रयत्न केला तर रकमेच्या ०.५० टक्के किंवा कमीत कमी २५ रुपये शुल्क लावण्यात येईल. हे शुल्क प्रत्येक डेबीटवर लावण्यात येणार आहे.
सेव्हींग आणि करंट अकाऊंटमधून दरमहा २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम कुठल्याशी शुल्काविना काढता येणार आहेत. मात्र त्यापेक्षा जास्तवेळा पैसे काढले तर शुल्क भरावे लागेल.
एवढेच नाही तर या दोन्ही खात्यांमध्ये ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यासही शुल्क लावण्यात येईल. हे खातेधारक कुठल्याही शुल्काशिवाय १० हजार रुपये आपल्या खात्यात जमा करू शकतात. त्यापेक्षा जास्त रकमेवर ०.५० टक्के शुल्क लागेल. बेसिक सेव्हींग खातेधारकांना रोख जमा करण्यावर कुठलेही बंधन नाही, असेही पोस्टाने स्पष्ट केले आहे.