मालेगाव – दाभाडी येथील युवा शेतकरी मयुर अमृत निकम यांनी पोळ्याचे औचित्य साधून साकारलेली `जीवा शिवाची जोड`ही बैलजोडी सध्या विशेष चर्चेची बनली आहे. बैलजोडीच्या अंगावर माजी केद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धवव ठाकरे यांचे चित्र रंगविल. तसेच, त्यांच्या राजकीय मैत्रीसह ‘जीवा शिवाची जोडी’ अशी राजकीय शेरेबाजीचे अनोखे प्रतिबिंब रेखाटले.
बैलपोळा हा शेतकरी बांधवांचा आवडता सण. यंदा कोरोनाचे संकट या सणावर होते. पण सर्जा राजाच्या प्रतीचा आदर तसूभरही कमी झाला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा मुक्त संचार असतानाही पिढीजात बैलांचा खुंटा मात्र अद्यापही कायम आहे. ग्रामीण भागात पोळ्याच्या उत्सावाने बैल आणि शेतकरी याचे घट्ट नाते संकटकाळी अधोरेखित झालेच. पण मयुर निकम या युवा शेतकऱ्याने राजकीय घोषवाक्यांची पेरणी करत अनोखी रंगत भरवली. बैलाच्या दुसऱ्या बाजूवर राजकीय कुरघोडी करतांना फडणवीसांना इशारा देतांनाच वाघ वाघच….! चा आत्मविश्वास रेखाटला आहे. तर दुसऱ्या बैलाच्या अंगावर राज्याचे विद्यमान कृषीमंत्री दादा भुसे यांचे चित्र रंगवत बळीराजाचा कैवारी असा आदर व्यक्त केला आहे. दुसऱ्या बाजूला या सर्व संकल्पनेला नाद खुला म्हणत वेगळेपण अधोरेखित केले आहे.
बैलांना बघण्यासाठी झुंबड
राम निकम यांच्या कुंचल्यातून नेत्यांचे अप्रतिम चित्रे रंगवून घेतली आहेत. गावकुसावर या बैलांना आणि संकल्पनेला बघण्यासाठी मोठी झुंबड उडाली तर आणि अनोख्या संदेशामुळे दाद मिळत आहे. ग्रामीण व शहरी भागात या संक्ल्पनेला सोशल मिडीयावर प्रचंड पसंतीसह कौतुकाची थाप मिळते आहे. राजकीय अभिनिवेष थेट बैल पोळ्यावर अवतरल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.