नाशिक – शहर पोलीस हद्दीतील गंगापूर पोलीस ठाण्यात मद्यधुंद दोघा महिलांनी गोंधळ घालत महिला पोलीसास मारहाण केल्याची घटना घडली आहे. अमिका विलास कोइनकर व सिमा विलास कोइनकर (रा. दोघी, श्रीराम अपार्टमेंट, श्रीगुरूजी रूग्णालयामागे, गंगापूररोड) अशी दोघींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई मीरा मोटे यांच्या फिर्यादीनुसार, दोन्ही संशयित महिलांनी मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केले होते. त्यांच्यात भांडणे झाल्याने त्यांना गंगापूर पोलिस ठाण्यात आणले असता, त्यांच्यातच फ्री-स्टाईल सुरू झाली. त्यांना सोडवण्याचा प्रयत्न पोटे या करत असताना दोघींनी त्यांना शिवीगाळ करत खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस शिपाई रूपते यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करून पायास चावा घेतला. पोलिस ठाण्यात गोंधळ घालत फॅनची तोडफोड केली. या प्रकरणी दोघींवर सरकारी कामात अडथळा, तसेच दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक उपनिरिक्षक पवार करीत आहेत.