मुंबई – मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक अजय रामदास जोशी यांना राष्ट्रपतींचे पोलिस मेडल जाहीर झाले आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते पोलिस सेवेत आहेत. अतिरेकी कारवाई विरोधी पथक, गुन्हे शाखा या ठिकाणी त्यांनी काम करून अतिशय संवेदनशील अशा गुन्ह्यांचा छडा लावण्याची कामगिरी पार पाडली आहे. त्यांना गुणवंत पोलिस अधिकारी म्हणून हे पदक जाहीर करण्यात आले आहे. १५ वर्षे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच गुन्हे तपासात अत्यंत मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अशा पदकाने सन्मानित करण्यात येते. अजय जोशी हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील भारम येथील आहेत. त्यांचे वडिल रामदास जोशी हे सुद्धा पोलिस होते. त्यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांच्या कारकिर्दीत तीन वेळा राष्ट्रपतींचे पोलिस मेडल मिळाले होते.