नाशिक – नवनियुक्त पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहर पोलिस आणि होमगार्डस यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार पोलिस आयुक्तालय परिसरात १०० बेडचे अत्याधुनिक कोविड सेंटर साकारले जाणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून येथे सुविधा दिली जाणार आहे. हे सेंटर येत्या एक-दोन दिवसातच सुरू होण्याची चिन्हे आहेत.
पोलिस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, ७० पुरुष आणि ३० महिला यांच्यावर या सेंटरमध्ये उपचार होऊ शकतील. पोलिस, त्यांचे कुटुंबिय आणि त्यांचे जवळचे नातेवाईक, होमगार्ड यांना त्यात प्रवेश मिळू शकेल. मुंबईच्या आर्थर रोड जेल येथे कोविड सेंटरद्वारे उत्तम सुविधा देण्यात आली. २५० जणांना कोरोनाची बाधा झाली. मात्र, तेथे एकही मृत्यू झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. हे सेंटर पांडे यांच्याच नेतृत्वात साकारण्यात आले होते. त्या धर्तीवर नाशकातील पोलिसांसाठी सुविधा निर्माण केली जाणार आहे.
कोरोना योद्धा असलेल्या पोलिसांचे आयुष्य अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पोलिस सुरक्षित राहण्यासाठी हे सेंटर महत्त्वाचे योगदान देणार असल्याचे ते म्हणाले. लवकरच एक व्हॉटसअॅप हेल्पलाईन क्रमांक पोलिसांसाठी जाहीर केला जाणार आहे. त्यावर संपर्क करताच तातडीने संबंधितांना आरोग्य मदत मिळेल. तसेच, पोलिसांसाठीच विशेष अॅम्ब्युलन्सही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोरोनाची भीती दूर व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.