नाशिक – शेतकऱ्यांचा माल घेऊन वेळच्यावेळी पैसे न देणाऱ्या १४ व्यापाऱ्यांपैकी एका व्यापाराने ७ लाख पन्नास हजार रुपये परत केले असून फसवणूक करणाऱ्या अन्य व्यापाऱ्यांनी दहा दिवसात रक्कम परत करण्यासंबंधी लेखी स्वरूपात हमी दिली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या कार्यवाहीमुळे फसवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप लागला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण १४ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक परिक्षेत्रात द्राक्ष, कांदा, डाळिंब अशा निरनिराळ्या फळभागाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कांदा निर्यातीसाठी व्यापारीवर्ग येत असतो. यावेळी काही व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात परंतु पैसे देण्यास दिरंगाई करतात. तसेच बनावट धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक देखील करतात. दिघावकर यांच्या आदेशाने शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.
१४ गुन्हे दाखल
शेतमालाच्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असतांना नाशिक ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पाचही जिल्ह्यातील शेतमालाच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी दिंडोरी, निफाड, सिन्नर येथे प्रत्यक्ष भेट देऊन फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वणी पोलीस ठाणे, पिंपळगाव, दिंडोरी, लासलगाव, सिन्नर, सटाणा येथे एकूण १४ जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याने तीन शेतकऱ्यांना एकूण शेतमालासंबंधी फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदावावी, असे आवाहन दिघावकर यांनी केले आहे.
फसवणूक थांबणार
शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी दिघावकर यांच्या कार्यवाहीमुळे शेतमालाचे पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगली अद्दल घडली आहे. याद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे सहकार्य भविष्यात पोलिसांकडून मिळावे यासाठी ग्रामस्थांनी सदिच्छा दिल्या आहेत.