आमदार फरांदे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र
नाशिक – अयोध्या राम जन्मभूमी येथे श्रीराम मंदिर भूमीपूजनादिवशी नाशिक पोलीस प्रशासनाकडून राम भक्तांवर कारवाई करण्यात आली. पंचवटीतील काळाराम मंदिराच्या सभोवती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी असणारा छोटा झरोका देखील बंद करण्यात आला. भक्तांनी दर्शन घेऊ नये म्हणून श्रीरामालाच अटक करण्याचा प्रकार झाल्याचा आरोप आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे. यासंदर्भात फरांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र देऊन निषेध व्यक्त केला आहे.
फरांदे यांनी पत्रात म्हटले आहे की, अयोध्येत होणारे नवीन राम मंदिर हा भारतीय संस्कृतीवर लागलेला डाग पुसण्याचा ऐतिहासिक क्षण असताना पोलीस प्रशासनाकडून मात्र नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. राम भक्तांनी परवानगीची मागणी केलेली असताना रात्री-अपरात्री राम भक्तांच्या घरी जाऊन परवानग्या नाकारण्यात आल्या.
रांगोळी काढल्यामुळे किंवा झेंडे किंवा बॅनर लावल्यामुळे करोना पसरत नसताना देखील नागरिकांना रांगोळी काढण्यापासून प्रवृत्त करण्यात आले. झेंडा बॅनर काढून घेण्यात आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना भगव्या झेंड्यावर बंदी लावण्याचा प्रकार झाल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. नाशिक कुंभ भूमी असताना साधुसंतांना रामतीर्थ वर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला, हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. निषेधाची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्रात करण्यात आली आहे.