नाशिक – आमदार देवयानी फरांदे यांनी मोठ्या संख्येने महिलांसह इंदिरानगर पोलिस स्टेशन येथे जमाव केला. अखेर पोलिसांनी इशारा देताच आमदारांसह सर्व महिलांनी काढता पाय घेतला.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील सादिकनगर भागात रविवारी (२० डिसेंबर) रूग्ण महिलेचा एका डॉक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पिडीतेच्या संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. तसेच दवाखान्याची मोडतोड केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित डॉक्टरसह मारहाण करणाऱ्या पिडीतेच्या नातेवाईकांना आज (२२ डिसेंबर) सकाळी अटक केली. त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांचा जमाव इंदिरानगर पोलिस ठाण्यावर चालून आला. यावेळी जमावाचे रूपांतर मोर्चात होवून पिडीतेच्या नातेवाईकांना या प्रकरणात नाहक गोवण्यात आले असून पोलिसांनी त्यांना सोडून द्यावे, अशी मागणी महिलांनी केली. शेकडो महिलांच्या या मोर्चाने पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडण्याची तयारी सुरू केली. अखेर पोलिस उपायुक्त विजय खरात आणि सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी धाव घेत महिलांची समजूत काढली. शीघ्र कृती दलासह अतिरिक्त बंदोबस्तही यावेळी मागविण्यात आला. त्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. कोविड-१९ मुळे जमाव जमविणे कायद्याने गुन्हा असल्याने महिलांनी येथून निघून जावे, असे आवाहन करण्यात आले. मात्र संशयित नातेवाईकास सोडून देण्याची यावेळी मागणी लावून धरण्यात आल्याने अखेर पोलिसांना ध्वनीक्षेपणाचा वापर करीत इशारा दिल. तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत असून तातडीने निघून जावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देताच जमावाने काढता पाय घेतला.
बघा व्हिडिओ