यवतमाळ – देशभरात पल्स पोलिओ डोस पाजण्याची मोहीम सुरू असताना यवतमाळमध्ये धक्कादायक आणि निष्काळजीपणाची घटना घडली आहे. घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी येथे मोहिमेदरम्यान १२ बालकांना पल्स पोलिओऐवजी सॅनिटायझरचा डोस पाजण्यात आला. या घटनेनं एकच खळबळ उडाली. बालकांना यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्व बालके धोक्याच्या बाहेर आहेत. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांअतर्गत रविवारी कापसी कोपरी गावात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आरोग्य कर्मचार्यांनी बालकांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजल्यानं रात्री बालकांना पोटदुखी आणि उलट्याचा त्रास होऊ लागला. घाबरलेल्या पालकांनी त्यांना यवतमाळमधील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी रात्री रुग्णालयात जाऊन मुलांच्या तब्येतीची चौकशी केली. गिरीश गेडाम, योगीश्री गेडाम, अंश मेश्राम, हर्ष मेश्राम, भावना आरके, वेदांत मेश्राम, राधिका मेश्राम, प्राची मेश्राम, माही मेश्राम, तनुज मेश्राम, आस्था मेश्राम, अशी बालकांची नावे असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सीईओंकडून चौकशी
या घटनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून चौकशी सुरू झाली आहे. आरोग्य अधिकारी आशा, अंगणवाडीसेविकांना ही चूक लक्षात आली मात्र त्यांनी ती दडवून ठेवल्याचं सांगण्यात येत आहे.