नाशिक – फी थकल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला शिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकारी स्वतः शाळेत चौकशीसाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. तसेच, नोटिशीला योग्य उत्तर न दिल्यास शाळेवर गंभीर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी पालकांकडे फी साठी तगादा लाऊ नये किंवा फीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नये, असे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, टाकळीरोड येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कडून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात पालक चंदन पवार यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. तसेच, शिक्षणमंत्र्यांपर्यंतही या तक्रारी पोहचल्या होत्या. त्याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन त्याची खात्री केली. शाळेने ऑनलाईन परीक्षेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र पाठविले आहे. तसेच, शाळेला कारणे दाखवा नोटिस बजावल्याची त्यात नमूद केले आहे.
—
ज्या विद्यार्थ्यांची फी भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार शिक्षण मंडळाकडे केली असून नाशिक महानगरपालिकेने पोद्दार शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
– चंदन पवार, पालक