नाशिक – महानगरपालिकेतील बहुचर्चित पेस्ट कंट्रोल ठेका मुदतवाढ न देता तत्काळ रद्द करावा व नवीन निविदा काढल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे काम देण्यात यावे यासाठी छत्रपती युवा सेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.
नाशिक शहराची परिस्थिती कोरोनाामुळे अतिशय बिकट असून रुग्णांना बेड मिळणे देखील कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बोगस पेस्ट कंट्रोल फवारणीमुळे डेंगू, मलेरिया, हिवताप, असे अनेक आजार डोके वर काढत असून नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यास नाशिक महानगरपालिका जबाबदार असून पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला काम दिल्यामुळेच नाशिककरांचे हाल होत असल्याचा आरोप छत्रपती युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे.
तात्काळ पेस्ट कंट्रोल ठेकेदारास मुदतवाढ न देता नवीन निविदा उघडण्यात येऊन नाशिक महानगरपालिकेच्या नियमानुसार काम देण्यात यावे अशी मागणी छत्रपती युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर ठेका रद्द न केल्यास नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अण्णासाहेब खाडे, जिल्हाप्रमुख तुषार भोसले, महानगरप्रमुख यश बच्छाव, संतोष टिळे, यश बागमर. मयूर दाते आदी उपस्थित होते.