नाशिक : पेट्रोल पंपाची बेवसाईटवर बनावट जाहिरात प्रसिध्द करून एका सिव्हील इंजिनिअरला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यात आठ लाख रूपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाउन काळात हा प्रकार घडला आहे. सोनवणे यांनी पेट्रोल पंप सेलर डॉट कॉम या वेबसाईटची पडताळणी केली असता ही घटना घडली. या बनावट वेबसाईटवर भामट्यांनी भारत पेट्रोलीयम कंपनीची डिलरशीप देण्याबाबत जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यात सोनवणे यांचा भूंखड असलेल्या परिसराचा समावेश असल्याने त्यांनी वेबसाईटवर आपली माहिती भरल्याने हा प्रकार अंगलट आला आहे.
या फसवणूक प्रकरणी राजेंद्र सुदामराव सोनवणे (रा.मातोश्रीनगर,तिडके कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे हे सिव्हील इंजिनिअर असून त्यांचा शहरात रोडफ्रंट भूखंड आहे. पेट्रोल पंप टाकण्यासाठी त्यांनी जाहिरातीत माहिती भरली. त्यानंतर २ मे २०२० रोजी विनोद पांडे आणि अमित त्यागी नामक भामट्यांनी त्यांच्याशी वेगवेगळया मोबाईलवरून संपर्क साधून भारत पेट्रोलीयम कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून सोनवणे यांची माहिती घेतली. या दरम्यान सोनवणे यांना पंधरा लाख रूपयांची मागणी करण्यात आली. वेगवेगळा बहाना करून संशयीतांनी ९३७२३८६३७५,९१७२२४८४६६ व ९८३१९३५३५२ या मोबाईलशी संलग्न कॅनरा बँक आणि बॅक आॅफ इंडियाच्या खात्यात तब्बल आठ लाख रूपये भरण्यास भाग पाडले. भूखंडाची पाहणी न करताच भामट्यांकडून पैश्यांची मागणी वाढल्याने सोनवणे यांनी कंपनीशी संपर्क साधला असता आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भामट्यांनी बनावट वेबसाईटच्या माध्यमातून सोनवणे यांना आठ लाख रूपयांना गंडा घातला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहेत.