मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या १५ दिवसांत १० टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे २४ दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल–डिझेलच्या किंमतीही घसरल्या आहेत. पेट्रोल–डिझेलच्या दराचा दररोज घेतला जाणारा आढावा २४ दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलीटर ४ रुपये आणि डिझेलच्या विक्रीवर प्रतिलीटर २ रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे वाढते दर एकाएकी बदलायचे थांबले होते. त्यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये लीटरमागे ४ रुपये आणि डिझेलमध्ये लीटरमागे २ रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. त्या पार्श्वभूमीवर आज पेट्रोल १८ तर डिझेल १७ पैश्यांनी स्वस्त झाले आहे.
गेल्या २४ दिवसांपासून हे दर स्थिर होते. मुंबईत पेट्रोलचा दर कालपर्यंत ९७.५७ रुपये होता, आज तो ९७.४० रुपये झाला आहे. डिझेलचे दर ८८.६० रुपये प्रतीलीटरवरून ८८.४२ रुपयांवर आला आहेय हे दर सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
फेब्रुवारी महिना तर इंधन दरवाढीचाच होता. शंभरी गाठण्यापर्यंत पेट्रोलने मजल मारली होती. आता १८ पैश्यांनीच का होईना पण थोडा दिलासा मिळाला आहे. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे इंधनाची मागणी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ७१ डॉलरवर गेलेले कच्च्या तेलाचे बॅरल ६४ डॉलरवर गेले आहे. त्यामुळे आईल कंपन्यांनी पेट्रोल–डिझेलच्या दरात कपात केली आहे.
दरम्यान, भारतात मात्र पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर इंधन दरवाढ रोखून धरण्यात आली आहे, असेही बोलले जात आहे.