नवी दिल्ली ः आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील ही आशा धुसर झाली आहे. कारण की, जगातल्या तेल उत्पादन देशांची संघटना असलेल्या ओपीईसी देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ज्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं तेवढंच उत्पादन करण्याचा स्तर राखण्याचा निर्णय घेण्यात आला.
सौदी अरबच्या नेतृत्वाखाली ओपेक देशांची गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये ओपेकचा सदस्य नसलेला पण प्रमुख तेल उत्पादक असलेला देश रशियाही सहभागी झाला होता. जागतिक अर्थव्यवस्था कोरोनामुळे मंदीच्या खाईत गेल्यानं ओपेकनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची निर्यात करणार्या अनेक देशांना याचा फटका बसणार आहे.
ओपेकच्या निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौदी अरबने येत्या एप्रिलपर्यंत कच्च्या तेलाच्या उत्पादनात रोज दहा लाख बॅरेलची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीच्या आधी जागतिक विश्लेषकांचं असं मत होतं की ओपेकद्वारे कच्च्या तेलाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ होईल.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलांच्या किमतीत घट होईल आणि त्याचा फायदा जगातल्या इतर देशांना त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी होईल. परंतु ओपेकनं त्यांच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणतीही वाढ न करण्याचा अनपेक्षित निर्णय घेतल्याचं मत अनेक विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
ओपेकच्या या निर्णयानं अमेरिकेतल्या शेअर बाजारमध्ये गुरुवारी कच्च्या तेलांच्या किमतीत ५.६ टक्क्यांची वाढ होऊन ती ६४.७० डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचली आहे. अमेरिकेत सलग दुसर्या दिवशी इंधनांच्या किमतीत वाढ झाली आहे.