नवी दिल्ली – भारत आणि चीनमधील तणाव लक्षात घेता चीनच्या अब्जाधीश उद्योजक जॅक मा यांच्या मालकीची असलेली अलिबाबाची उपकंपनी अँट ग्रुप ही भारतीय डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस प्रदाता (पेटीएम) मधील आपली भागीदारी कमी करणार आहे. त्यामुळेच पेटीएममधील ३० टक्के हिश्शाची ते लवकरच विक्री करु शकतात. यासंदर्भात अद्याप दोन्ही कंपन्यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
एका अहवालानुसार, अलिबाबा व अँट ग्रुप लवकरच पेटीएममधील आपला ३० टक्के हिस्सा विकणार आहे. कारण भारत- चीन मधील वाढता तणाव लक्षात घेता वाढत्या स्पर्धेमुळे कंपनी आपला हिस्सा विकण्याचा विचार करीत आहे. यावर्षी जूनमध्ये लडाख सीमेवर दोन देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने चीनच्या अनेक मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. त्याचबरोबर चीनने गुंतवणूकीचे नियम कठोर केले आहेत. बंदी घातलेल्या अॅपमध्ये अलिबाबाच्या अॅपचा समावेश आहे.
सदर ग्रुप आता कोणत्याही भारतीय कंपनीत आपली भागीदारी वाढविण्याच्या विचारात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीने २०१५ मध्ये प्रथमच भारतीय डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस मध्ये गुंतवणूक केली. पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, सध्या कोणत्याही ग्रुपशी भागभांडवल विक्री करण्यासाठी कोणतीही चर्चा झाली नाही. किंवा अशा कोणत्याही योजनेचा विचार केला जात नाही.