पुणे ः पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची या प्रकरणात काय भूमिका आहे, याबाबत कसून चौकशी करण्यात येणार आहे. अकरा दिवसांनंतर पोलिसांनी कारवाई करत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असलं तरी दोन्ही संशयित कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. ज्यांच्यावर संशय आहे अशा लोकांचा तपास करू शकतो, असं पोलिसांनी सांगतिलं. त्यामुळे हे दोघे कोण आहेत, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.
काय आहे प्रकरण
बीडमधल्या परळीतल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध पूजा चव्हाण (वय २२) हिने पुण्यात ८ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. वानवडी इथल्या हेवन पार्कमध्ये ती चुलत भाऊ आणि मित्रासोबत राहात होती. सोशल मीडियामध्ये विशेषतः टिकटॉक अॅपवर ती प्रसिद्ध होती. परंतु सोमवारी तिनं इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं. याप्रकरणी महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांवर आरोप झाले. या प्रकरणाबाबत दहा ते बारा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.