मुंबई – बीडमधल्या पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या मूळ कारणापर्यंत पोहचण्यास मदत करणारा शवविच्छेदनाचा अहवाल (पीएम रिपोर्ट) वानवडी पोलिसांच्या हाती लागल्याचं कळतं आहे. जबर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात म्हटलं होतं. त्याप्रमाणेच शवविच्छेदनाच्या अहवालातूनही हेच स्पष्ट होत आहे. पूजाच्या मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं कारण समोर येत आहे, असं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे. याबाबत पोलिसांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यावरच याबाबत अधिक माहिती दिली जाईल, असं तपास अधिकार्यांनी सांगितलं.
तत्पूर्वी याप्रकरणी भाजपकडून आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा स्वीकारतानाच विरोधकांकडून गलिच्छ राजकारण होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता.
दरम्यान, पूजाच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पूजाची आजी शांताबाई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपोषणाला बसल्या आहेत. मात्र शांताबाई राठोड यांचा आमच्या कुटुंबाशी रक्ताचे नाते नाही, असं पूजाच्या आई-वडिलांनी आपल्याला सांगितल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.