हास्यबुफेची वाचनीय मेजवानी
कवी, साहित्यिक, रंगकर्मी सतिश मोहोळे यांच्या हास्यबुफे या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी ( दि.१७) होत आहे. सायंकाळी ५ .३० वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात हा कार्यक्रम उद्वेली प्रकाशनातर्फे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे हे पुस्तक प्रकाशन मोहोळे यांचे वर्गमित्र व ज्येष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रसिक वाचकांना हास्यबुफेची वाचनीय मेजवानी मिळेल.
सतिश माझा शालेय मित्र
सतिश मोहोळे हा माझा शालेय मित्र. म्हणून हक्काने हा एकेरी उल्लेख ! आम्ही १९७५ साली पेठे विद्यालयातून अकरावी उत्तीर्ण झालो. मध्यंतरीच्या काळात व्यापांंमुळे एकमेकांपासून दुरावलो.दोन वर्षांपूर्वी समाजमाध्यमाने आम्हा १५० मित्रांना एकत्र आणले.सतिश बँक ऑफ इंडियात नोकरी करून सेवानिवृत्त झाला. मात्र त्याने आपल्यातील कलाकाराला कायम जागृत ठेवले. मराठी कथाकार म्हणून तो सुपरिचित आहे.गेली अनेक वर्षे त्याच्या कथा विविध मासिके व दिवाळी अंकांंमधून प्रकाशित होतात. वाचकांच्या मनाला भिडणाऱ्या व सुयोग्य परिणाम साधणाऱ्या कथा लिहिणे हे त्याचे वैशिष्ट्य ! कथालेखनात दर्जा व सातत्य राखण्याचे कौशल्य त्याला अवगत झाले आहे. काव्यप्रांतातही त्याने मनसोक्त मुशाफिरी केली आहे. तो म्हणतो, ” आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, कटकटींना सर्वांनाच सामोरे जावे लागते. अश्यावेळी विनोदबुद्धी सतत जागृत ठेवणे अतिशय अवघड आहे. एखाद्याला रडवणे सोपे पण खळखळून हसवणे अत्यंत कठीण असते. तणावपूर्ण वातावरणात विनोदाचा शिडकावा आनंद निर्माण करतो. अशाच काही आनंदाच्या क्षणी, मनाच्या तरल आनंदावस्थेत माझ्या विनोदी कथांची निर्मिती होते. त्यातून रसिकांना निर्भेळ, निखळ आनंद मिळतो. “
हास्यकथांचा मळा फुलवला आहे
हास्य हे मानवाला लाभलेले वरदान आहे. हा दुर्मिळ अलंकारच म्हणावा लागेल. हसणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. हसण्याने दुःखाचा निचरा होतो. मन प्रसन्न होते. म्हणूनच मानवी जीवनात विनोदाला, हसण्याला अनन्यसाधारण स्थान आहे. विनोदामुळे दुःख, संकटे, अडचणी यांचा विसर पडून जगण्यातला हुरूप वाढतो. आसपास आढळणाऱ्या विसंगती हे विनोदाचे उगमस्थान ! अशीच जीवनाकडे खोडकर, खेळकरपणे बघण्याची दृष्टी सतिषकडे आहे. त्या भांडवलावर त्याने हास्यकथांचा मळा फुलवला आहे. मध्यमवर्गीयाच्या भूमिकेतून तो बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचे सूक्ष्म निरीक्षण करतो.
कथा वाचकाला अंतर्मुख करतात
रंगकर्मीच्या नजरेतून त्याला त्यातील नाट्य दिसते. त्यातल्या विसंगती टिपून त्यावर हसतखेळत टिप्पणी करतांना हास्यकथा जन्माला येतात. हास्यबुफे या विनोदी कथासंग्रहात १३ निवडक विनोदी कथांचा समावेश आहे. त्यातील घटना, प्रसंग दैनंदिन जीवनात आपल्यालाही अवतीभवती घडताना दिसतात. म्हणूनच कथांमधले ‘ पंच ‘ वाचकाला आपलेसे वाटतात. रविवारची मिसळ ही कथा रसिकांना आपलीच अनुभूती वाटेल.चमत्कारी (क) क्रेडिट कार्ड या कथेत सतिशने आधुनिक बँकिंगवर विनोदी भाष्य केले आहे. बुफे या कथेचा नायक रंगराव हा इरसाल खादाडपणाचा प्रातिनिधिक नमुना आहे. बुफेचे वर्णन आपण अनेक लग्नकार्यात अनुभवलेले असते.ते आठवून अधिकच हसायला येते. सतिशच्या कथा नुसत्याच हसवत नाहीत तर वाचकाला अंतर्मुख करतात. आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त करतात. काहीवेळा चटका लावतात.हे लेखकाचे यश आहे.
कमरेखालचे हिणकस विनोद कटाक्षाने टाळले
मोहोळेने आपल्याच जातभाईचे धमाल व्यक्तिचित्र हास्यरंगात रंगवले आहे. गजा पहिलवान आणि राजकारण मजा आणते. स्मशानभूमी म्हणजे कारुण्यमय, गंभीर स्थळ. मात्र तेथील विसंगती लेखकाने छान टिपली आहे. स्मशानातले खांदेकरी हास्यफवारे उडवतात. प्युअर व्हेजिटेरियन या कथेत हाऊसिंग सोसायट्यांंमधील जुंपणाऱ्या शीतयुद्धाकडे लेखकाने हसतखेळत लक्ष वेधले आहे. बच्चनची लोकप्रियता, पुरुषांवरील अत्याचार यावरही केलेल्या शाब्दिक कोट्या पोटभर हसवतात. एका सुप्रसिद्ध कोचिंग क्लासशी नामसाधर्म्य असणाऱ्या नावाची कथा लक्षवेधी आहे. विद्यार्थी व पालकांना लक्ष्य करण्यासाठी क्लासचालक कशा युक्त्या करतात हे वाचून हसताना वाचक अस्वस्थ होतो. असेच हास्यतुषार बार…,चवळीची शेंग या कथा वाचताना उडतील. प्रसंगनिष्ठ विनोदांबरोबरच अतिशयोक्ती, शाब्दिक कोट्या यांचा मोहोळेने सुयोग्य वापर केला आहे.’पुलं’ ना आदर्श मानणाऱ्या सतिशने कमरेखालचे हिणकस विनोद कटाक्षाने टाळले आहेत. त्याबद्दल त्याचे अभिनंदनच केले पाहिजे. विनोदाच्या माध्यमातून जाताजाता प्रबोधनही झाले आहे. हीच निखळ विनोदाची ताकद आले. सतिशच्या हातून यापुढेही उत्तमोत्तम लेखनसेवा घडो. त्याच्यातील कलाकाराला अनेक संधी लाभोत या शुभेच्छा !
चतुरस्त्र कलाकार !
सतिशला १९९० साली वांद्रे, मुंबई येथे झालेल्या एकांकिका स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपदक मिळाले. १९९९ मध्ये त्याने आर्थिक विषयावरील निबंधस्पर्धेत पुरस्कार मिळवला. आत्मघात व इतर एकांकिका हा त्याचा संग्रह प्रकाशित झाला. सन १९९८-९९ मध्ये त्याने राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार पटकावला. त्याची गाय नावाची कथा आकाशवाणी नाशिक केंद्रावरून प्रसारित झाली आहे.अंतर्नाद हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून त्याच शिर्षकाच्या कथेला दिवाळी अंक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. आमच्या वहिनी सौ. शुभदा या भोसला शिक्षणसंस्थेत नोकरी करतात. त्यांचा सतिशच्या व्यस्त कार्याला उत्स्फूर्त पाठिंबा असतो. त्याची मुलगी मधुरा पुण्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये नोकरी करते तर मुलगा नहूष फायनान्स क्षेत्रात नुकताच रुजू झाला आहे. दोघांचेही बाबांना प्रोत्साहन असते. ८७ वर्षांच्या वयोवृद्ध मातेचे सतिशला आशीर्वाद आहेत. या चतुरस्त्र कलाकाराला व त्याच्या कलेला सलाम !
संजय देवधर
९४२२२७२७५५