स्वाक्षरीचे जग
ज्येष्ठ विधिज्ञ आणि साहित्याचे अभ्यासक एडवोकेट मिलिंद चिंधडे यांचे” स्वाक्षरीचे जग” हे एक आगळेवेगळे पुस्तक हाताशी आले. ते चाळून पाहत असताना, त्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या पाहतांना, त्यांची माहिती वाचताना गत काळातील अनेक स्मृती जागृत झाल्या.
प्रत्येक व्यक्तीला कोणता तरी एखादा छंद हा असतोच. छंदांचे अनेक प्रकार आहेत आणि कोणत्याही छंदाला वयाचे बंधन तर मुळीच नसते. परंतु तो छंद बालपणापासून जेष्ठ नागरिक होईपर्यंत सातत्याने सुरू ठेवणे ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे आणि एडवोकेट मिलिंद चिंधडे हे निश्चितच या कौतुकाचे अधिकारी आहेत.
” स्वाक्षरीचे जग “या पुस्तकातील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची स्वाक्षरी पाहतांना मी एकदम १९५५ या सालात गेलो. त्यावेळी मी इयत्ता पाचवीत होतो. सिन्नरला साने गुरुजी कथामाला सुरू झाली होती आणि त्यावेळी कुसुमाग्रज उद्घाटनाला आले होते. त्यावेळी मी त्यांची स्वाक्षरी घेतली होती.नंतर याच काळात ना.ग. गोरे, बॅरिस्टर नाथ पै, आचार्य अत्रे यांच्या सह्या घेतल्या.
या स्वाक्षरी संग्रहातील वैशिष्ट्य म्हणजे एडवोकेट चिंधडे यांनी फक्त साहित्यिकांच्या सह्या घेतलेल्या आहेत असे नाही तर राजकारण, क्रीडा विश्व, चित्रपट सृष्टी, पत्रकारिता, कला, समाजकारण, न्यायालयीन क्षेत्र या क्षेत्रातील मान्यवरांच्या सह्या घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्या त्या मान्यवरांच्या सह्या केव्हा घेतल्या, तसेच त्यांचे कार्य काय याचीही माहिती चिंधडे यांनी दिलेली आहे.
” स्वाक्षरीचे जग “या पुस्तकातील मान्यवरांच्या सह्या पाहताना त्यातील काही व्यक्तींच्या नंतर दीर्घकाळ भेटीगाठी होत राहिल्या. ते सर्व प्रसंग चित्रपटातील एकेक दृश्याप्रमाणे समोर येत गेले. आज त्यातील अनेक व्यक्ती हयात नसल्या तरी ते प्रसंग सहज समोर आले.
विशेष म्हणजे बालपणात अशा स्वाक्षऱ्या घेण्याची छंद अनेकांना असतात. परंतु पुढे हा छंद कायम राहतो असे होतेच असे नाही. परंतु त्यापेक्षा आणखी कौतुकाची गोष्ट म्हणजे या स्वाक्षऱ्या छंदाचे पुस्तकरुपाने सादरीकरण करणे ही कल्पनाच खूप आगळीवेगळी आहे. मराठी साहित्यात असे हे पहिलेच पुस्तक असावे असे मला वाटते एडवोकेट मिलिंद चिंधडे यांचे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
– लेखन – रमाकांत देशपांडे
पुस्तकाचे नाव: स्वाक्षरीचे जग.
लेखक: अॅड. मिलिंद चिंधडे.
प्रकाशक : हरिओम प्रकाशन, नाशिक.
पृष्ठे- १४४,
किंमत – १३० रुपये.