पुस्तक परिक्षण – ज्येष्ठांचा ‘अर्थ’पूर्ण आधार
निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरळीत जावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी व्यावहारिक नियोजन करण्याच्या आवश्यकतेवर ज्येष्ठांचा ‘अर्थ’पूर्ण आधार या पुस्तकात भर देण्यात आला आहे. निवृत्ती लक्षात घेऊन आवर्जून करण्याच्या आर्थिक बाबींचा विचार शास्त्रीय पद्धतीने सदर पुस्तकातून मांडला आहे.
१९८१ पासून लेखापाल म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. विनायक गोविलकर आर्थिक साक्षरतेसाठी सातत्याने काम करत आहेत. २० पुस्तकं, १५ पुस्तिका आणि ७०० पेक्षा अधिक लेखांच्या माध्यमातून आर्थिक स्थित्यंतराचे विश्लेषण सुलभपणे करत आहेत. आपल्या अनुभवाच्या आधारे ज्येष्ठांचा ‘अर्थ’पूर्ण आधार हे संदर्भपूर्ण पुस्तक लिहून लेखक विनायक गोविलकर यांनी वाचकांची नेमकी गरज पूर्ण केली आहे.
नामांकन, गुंतवणूक, बक्षीस पत्र, इच्छापत्र, मृत्युपत्र, उलट/व्यस्त गहाण, आयकर दायित्व आणि सवलती, लिव्हिंग विल, माहिती सामायिकरण अश्या एकूण दहा प्रकरणातून ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक गरजांची मुद्देसूद मांडणी केली आहे. शासकीय नियम, अर्जाचे नमुने, तक्ते यातून आवश्यक माहिती दिली आहे.
निवृत्तीनंतरचा विचार फारसा गंभीरपणे केला जात नाही. थकणारे शरीर आणि वाढणारे वय यातून ताण वाढत जातो. मात्र, हाती फार काही नसल्याने एक भीती जाणवते. ज्येष्ठ नागरिकांची ही आगतिकता लक्षात घेऊन त्यांना आश्वासक सावली देण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. आयुष्यभराच्या पुंजीचे योग्य नियोजन आणि भविष्यासाठी तरतूद यावर पुस्तकात विस्तृत माहिती दिली आहे.
भविष्याच्या सुरक्षेची प्रकर्षाने काळजी वाटणे, नोकरी किंवा व्यवसायातील निवृत्तीनंतर पुढील आयुष्यासाठी आर्थिक दडपण जाणवणे स्वाभाविक आहे.
संध्या छाया भिववती ह्रदया – अशी काहीशी स्थिती होते. अश्यावेळी साठवलेल्या धनाचे नियोजन नीट प्रकारे केले आणि योग्य निर्णय घेतले तर वृध्दापकाळ सुखकर होतो.
जगण्याची दुसरी इनिंग आर्थिक विवंचनेतून मुक्त ठेवण्यासाठी कायदेशीर तरतुदी पूर्ण करणे आवश्यक असते. आयुष्याच्या दुसरा डाव आनंदी व्हावा यासाठी ज्येष्ठ अर्थ अभ्यासक प्रा. डॉ. विनायक गोविलकर यांनी लिहिलेले, अथश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले ज्येष्ठांचा ‘अर्थ’पूर्ण आधार हे पुस्तक संग्राह्य ठरणार आहे.
या पुस्तकाला ज्येष्ठ लेखापाल, टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की आणि ज्येष्ठ विधिज्ञ, कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन यांची प्रस्तावना आहे. या दोन्ही प्रस्तावनांतून आर्थिक आणि कायदेशीर बाबींवर मांडणी केली आहे. पुस्तकाचे उपयोजितपण विवेकानंद पत्की आणि सुरेश पटवर्धन यांच्या प्रस्तावनांनी अधोरेखित केले आहे. या दोन्ही प्रस्तावनांतून पुस्तकातील आर्थिक आणि कायदेशीर माहितीवर प्रकाश टाकला आहे. पुस्तकाचे संदर्भमूल्य दोन्ही प्रस्तावनांतून स्पष्ट होते.
प्रा.डॉ.विनायक गोविलकर यांचे अभ्यासपूर्ण छोटेखानी पुस्तक प्रभावी आहे. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे सुरक्षित भविष्य केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक साकारले आहे. ज्येष्ठांचा ‘अर्थ’पूर्ण आधार हे संदर्भपूर्ण पुस्तक लिहून लेखक विनायक गोविलकर यांनी लिहून आणि अथश्री प्रकाशनाने प्रकाशित करून वाचकांसाठी योग्य साहित्याची निर्मिती केली आहे.
काहीश्या अस्थिर आणि अनिश्चिततेच्या वातावरणात आधार देणाऱ्या पुस्तकाचे वाचक स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
ज्येष्ठांचा ‘अर्थ’ पूर्ण आधार हे पुस्तक सोप्या शैलीने वाचनीय झाले आहे. भेट म्हणून देण्यासाठी हे पुस्तक वैशिष्ठ्यपूर्ण ठरेल. सध्याच्या तणावाच्या आणि अस्वस्थतेच्या वातावरणात परिपूर्ण आधार देणाऱ्या पुस्तकाला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अस विश्वास वाटतो.
– मकरंद मुळे
●पुस्तकाचे नाव : ज्येष्ठांचा ‘अर्थ’पूर्ण आधार
●लेखक : डॉ. प्रा. विनायक म. गोविलकर, सी.ए.
●प्रकाशक : अथश्री
●पृष्ठ संख्या : शंभर
●किंमत : रुपये एकशे वीस